Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडीत ‘भराडी’चा जयघोष! दक्षिण कोकणच्या काशीचा यात्रोत्सव भक्तीमय वातावरणात सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:31 IST2026-02-09T19:30:29+5:302026-02-09T19:31:11+5:30
राजकीय नेत्यांची मांदियाळी

Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडीत ‘भराडी’चा जयघोष! दक्षिण कोकणच्या काशीचा यात्रोत्सव भक्तीमय वातावरणात सुरू
मालवण/आंगणेवाडी: 'आंगणेवाडीची भराडी देवी' या नावाने अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोकणच्या काशीचा वार्षिक जत्रोत्सव आज, सोमवारी पहाटेपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. पहाटे ठीक तीन वाजता देवीच्या दर्शनाचे द्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले आणि अवघी आंगणेवाडी 'आई भराडी'च्या जयघोषाने दुमदुमून गेली.
यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे देवीची विधीवत पूजा, अभिषेक आणि अलंकार चढवण्यात आले. त्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मानाची पूजा अर्चा पार पडली. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या यात्रेसाठी मुंबई, पुणे आणि गोवा येथून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले असून, मालवणच्या दिशेने येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
भक्तांच्या सुविधेसाठी चोख व्यवस्था प्रशासनाने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा विशेष काळजी घेतली आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य पथके आणि निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. दर्शन रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी 'आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळा'चे शेकडो स्वयंसेवक तैनात आहेत. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर ठेवली जात आहे.
राजकीय नेत्यांची मांदियाळी
आंगणेवाडीच्या जत्रेला राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. आज दिवसभरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते देवीच्या चरणी लीन होण्यासाठी येण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि 'शक्तिप्रदर्शन' यात्रेचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.
श्रद्धेचा जनसागर आणि बाजारपेठ
जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील विस्तीर्ण बाजारपेठ. खाजा, मातीची भांडी आणि कोकणी मेव्याच्या दुकानांनी परिसर गजबजला आहे. विशेष म्हणजे, नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने हजारो भाविक आपला नवस फेडण्यासाठी येथे दाखल होत आहेत. 'ओटी' भरण्यासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.