Sindhudurg: तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 18, 2024 13:13 IST2024-07-18T13:09:52+5:302024-07-18T13:13:16+5:30
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी , नाले ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. ...

Sindhudurg: तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बहुसंख्य धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसारच आतापर्यंत १२५ टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस रात्रीचा जोरदार पडत असून दिवसा काहीशी उघडीत देत आहे.
तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी असलेल्या रस्त्यांवरून, पुलावरून वाहतूक करू नये, अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 02362/228847, मोबाईल 7498067835, सावंतवाडी तहसील नियंत्रण कक्ष (02363)272028, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष (02362 )228614 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात आले आहे.
धरणे भरली; पाण्याचा विसर्ग सुरू
तिलारी, कोर्ले सातंडी, देवधर हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव यांचा समावेश आहे.