दहा अनधिकृत वाळू कॅम्प जमीनदोस्त; तहसीलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:00 IST2020-01-20T15:50:19+5:302020-01-20T16:00:33+5:30
अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच खाडीपात्रातून होडीसह कामगारांनी पोबारा केला.

दहा अनधिकृत वाळू कॅम्प जमीनदोस्त; तहसीलची कारवाई
मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच खाडीपात्रातून होडीसह कामगारांनी पोबारा केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनधिकृत वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मालवण तालुक्यातील खाडीपात्रांमध्ये वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे प्राप्त होत होत्या.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी कारवाई मोहीम हाती घेत बांदिवडे, कोईळ या भागात धाड टाकली. यात तीन ठिकाणचे दहा वाळू रॅम्प जमीनदोस्त केले तर परप्रांतीय कामगारांच्या दोन झोपड्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या.
ही कारवाई पाटणे यांच्या नेतृत्वाखाली डी. एस. सावंत, अरुण वनमाने, मंडळ अधिकारी केशव पोकळे, तलाठी धनंजय सावंत, कोतवाल सचिन चव्हाण आदींच्या पथकाने केली.
कालावल खाडीबरोबरच कर्ली खाडी पात्रातही अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासन आपला मोर्चा कर्ली खाडीत वळविणार असल्याची माहिती आहे.