Sindhudurg: गव्याची दुचाकीला धडक; आजगावच्या शिक्षिका जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:52 IST2025-08-12T16:51:23+5:302025-08-12T16:52:24+5:30
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Sindhudurg: गव्याची दुचाकीला धडक; आजगावच्या शिक्षिका जखमी
सावंतवाडी : सावंतवाडीहून आजगावच्या दिशेने जाणाऱ्या शिक्षिका सृष्टी रविराज पेडणेकर (४८) यांना न्हावेली-सोनुर्ली रस्त्याच्या मधोमध घोडेमुख येथील रस्त्यावर गव्याने जोरदार धडक दिली. या धडकेत त्या जखमी झाल्या आहेत. ही घटना सोमवारी घडली.
सृष्टी पेडणेकर या आजगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. नेहमीप्रमाणे श्रावण सोमवार असल्याने त्या सकाळच्या शाळेला निघाल्या होत्या. त्याचवेळी घोडेमुखनजीक त्यांची दुचाकी आली असता अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की शिक्षिका पेडणेकर या दुचाकीवरून खाली कोसळल्या.
त्याचवेळी तेथून स्थानिक ग्रामस्थ आणि आरोस हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक जात होते. त्यांनी शिक्षिका पेडणेकर यांना जखमी अवस्थेत तातडीने मळेवाड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना सावंतवाडीला पाठविले. यावेळी दत्तगुरू कांबळी आणि रूपाली कोरगावकर या शिक्षकांनी त्यांना मदत केली.
वनविभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी
न्हावेली-मळेवाड मार्गावर घोडेमुख परिसरात गव्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. जवळच वन विभागाची चौकी असूनही या समस्येवर ठोस उपाययोजना होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. या अपघातांबाबत वनविभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.