फोंडाघाटात इंधन वाहतूक करणारा टँकर पेटला; एकाचा होरपळून मृत्यू
By सुधीर राणे | Updated: December 5, 2024 11:55 IST2024-12-05T11:55:05+5:302024-12-05T11:55:37+5:30
कणकवली : सांगली-मिरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन घेवून येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर फोंडाघाटात दिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर ...

फोंडाघाटात इंधन वाहतूक करणारा टँकर पेटला; एकाचा होरपळून मृत्यू
कणकवली : सांगली-मिरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन घेवून येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर फोंडाघाटात दिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. त्यातील इंधनाला आग लागून भडका उडाला. या घटनेत एक व्यक्ती आगीच्या ज्वाळामुळे होरपळल्याने मृत्युमुखी पडली आहे. ही घटना बुधवारी घडली. मृताचे नाव समजू शकले नाही.
फोंडाघाटात अवघड वळणावर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरमधील इंधनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली,कुडाळ येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले होते.
या घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी कणकवली पोलिस रवाना झाले. फोंडाघाट येथील स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशी यांनीसुद्धा ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. कणकवली पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती जगताप,उपनिरीक्षक अनिल हाडळ,राजकुमार मुंढे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच या अपघातात कोण जखमी आहेत काय ? अजून कोण भाजले आहेत काय याची शहानिशा रात्री उशिरापर्यंत केली जात होती.
तसेच एका व्यक्तीचा आगीत होरपळलेल्या स्थितीत मृतदेह मिळाला असून तो कोणाचा आहे? याबाबतही शोध घेण्यात येत होता. त्याबाबत अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान,यापूर्वी याच तीव्र वळणावर फरशीचा एक ट्रक असाच कोसळला होता. त्यावेळीही वाहतूक कोंडी झाली होती.