बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसायाचा संशय, कणकवलीतील लक्ष्मी लॉजच्या मॅनेजरला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात
By सुधीर राणे | Updated: January 21, 2025 11:48 IST2025-01-21T11:48:07+5:302025-01-21T11:48:43+5:30
लॉज मालक रडारवर

बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसायाचा संशय, कणकवलीतील लक्ष्मी लॉजच्या मॅनेजरला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात
कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या संशयावरून बसस्थानकासमोरील लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय-३२, रा. कळसुली, ता.कणकवली) याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जानवली पूलानजीक काल, सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा करण्यात आली.
बुधवारी (दि.१५) कणकवलीत पकडण्यात आलेल्या दोन बांगलादेशी महिलांकडून लक्ष्मी लॉज येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार २० जानेवारी रोजी कणकवली न्यायालयात वाढीव पोलिस कोठडीची मागणी करताना तपासी अधिकारी उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध १९५६ चे कलम ५ (१) हे लावले होते.
लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओंकार याच्या मागावर पोलिस होते. तो जानवली नदी पुलाकडे येणार असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. आता लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.