सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग हा स्वार्थपीठ आहे, या महामार्गामुळे सत्ताधारी राज्याला कर्जाच्या खाईत लोटणार असून हा महामार्ग रद्द होण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन प्रसंगी कोणी फटके मारण्याची भाषा करत असेल तर मी फटके ही खायला तयार आहे. पण हा महामार्ग रद्द व्हायला हवा त्यासाठी सिंधुदुर्गने साथ द्यावी असे भावनिक आवाहन शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते सावंतवाडीत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रादेवी गोवा या परिसरालाही भेट दिली.यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, बाबुराव धुरी, संदेश पारकर, सतीश सावंत, डाॅ जयेंद्र परुळेकर, इर्शाद शेख, रुपेश राऊळ, संदिप सावंत, नागेश चौगुले, राजेंद्र गुडेनवर, संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख सुनिल शित्रे, रूपेश राऊळ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात आम्ही उभा केलेला लढा हा राजकीय नाही तर हा लढा भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आहे, पर्यावरण वाचविण्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण जनतेला महापुरा पासून वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे.
प्रकल्प दीड लाख कोटीपर्यंत जाणार
शासन या महामार्गावर ८६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, मात्र सरकारच्या कार्यपद्धतींचा विचार करताना कुठलाच प्रकल्प हा सांगितलेल्या रकमेत पूर्ण झाला नाही ही वस्तुस्थिती असून शक्तिपीठ हा प्रकल्प दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे आणि हा खर्च शासनाला परवडणारा नसून राज्य कर्जाच्या खाईत लोटणार जाईल अशी भिती व्यक्त केली. ..तर फटके खायची माझी तयारी सिंधुदुर्गातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देऊ अशी धमकी या ठिकाणी दिली जात आहे. मात्र जर खरोखरच हा महामार्ग रद्द होत असेल तर ते फटके खायची तयारी माझी आहे, स्थानिक आमदार दीपक केसरकर हे तर हा महामार्ग सिंधुदुर्गातून पूर्वी ज्या भागातून जात होता तो भाग वगळून आता दुसऱ्या मार्गाने जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र तशा प्रकारचा कुठलाही बदल राज्य सरकारने केलेला नाही.केसरकरांनी 'त्याचे' उत्तर द्यावेआमदार केसरकर यांच्या म्हणण्यानुसार तो दुसऱ्या बाजूने नेला तरी तेथील डोंगरातून बोगदा मारून तो पलीकडे कसा नेणार त्या ठिकाणी उत्खनन हे होणार नाही का तेथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटणार नाहीत का? याची उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्गनेही या महामार्गाच्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे.