शिव छत्रपतींचा पुतळा आता राजकोटला; सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नौदल तयार, जमीन मालकाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 05:04 PM2023-09-14T17:04:59+5:302023-09-14T17:05:42+5:30

जमिनीचा ताबा मिळत नसल्याने नौसेनेने या जागेचा हट्ट सोडला

Statue of Shiva Chhatrapati now in Rajkot; Navy ready for Sindhudurg fort, landowner refusal | शिव छत्रपतींचा पुतळा आता राजकोटला; सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नौदल तयार, जमीन मालकाचा नकार

शिव छत्रपतींचा पुतळा आता राजकोटला; सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नौदल तयार, जमीन मालकाचा नकार

googlenewsNext

मालवण: किल्ले सिंधुदुर्ग येथे जागा उपलब्ध न झाल्याने आता राजकोट किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी जमिनीची मोजणी करून जागाही निश्चित करण्यात आली आहे. नौसेनेच्या अधिकाऱ्यांनीही या जागेची पाहणी केलेली असून किल्ले सिंधुदुर्गसमोरच हा पुतळा बसविण्यात येणार असल्याचे समजते. महसूल विभागाकडूनही या जागेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रेही नौसेनेकडे सादर केल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. 

किल्याच्या मध्यभागी एक जागा नौसेनेकडून निश्चित करण्यात आली होती. ही जागा कोणाची आहे? याचा शोध घेण्यासाठी तीन ते चारवेळा भूमी अभिलेख विभागाकडून सर्व्हे करण्यात आला होता. नौसेनेकडून जी जागा निश्चित करण्यात आली होती. ती जागा नेमकी शासकीय जमिनीत दिसून आली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांकडून संबंधित जमीन मालकांशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, संबंधित जमीन मालकांनी शासनाला जमीन देण्यास विरोध दर्शविला. किल्ल्याच्या मध्य भागी असलेली ही जागाच नौसेनेला हवी होती. त्यामुळे जमिनीचा ताबा मिळत नसल्याने नौसेनेने या जागेचा हट्ट सोडला असल्याची माहिती पुढे आली आहे.

जमीन मालकाने शासनाला जमीन देण्यास विरोध दर्शविल्यामुळे गेले दोन महिने प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या जमीन शोध मोहिमेच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथे नौसेना दिन साजरा होत असताना किल्ले सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी शासनाकडून जमिनीचा शोध घेण्यात येत होता. नौसेना विभागाकडून पसंत करण्यात आलेली जमीन ही खासगी मालकीची असल्याने जमीन मालकांनी शासनाला जमीन देण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता छत्रपतींचा पुतळा मालवण शहरात बसविण्यासाठी किनारपट्टीवरील जागेचा शोध घेतला जात होता. 

३५ फूट उंची पुतळा

यंदाचा भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार आहे. कार्यक्रमापूर्वी किल्ल्यात सुमारे ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प नौसेनेने केला होता. मात्र आता तो राजकोटला उभारला जाईल.

Web Title: Statue of Shiva Chhatrapati now in Rajkot; Navy ready for Sindhudurg fort, landowner refusal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.