खड्डे चुकवताना एसटी बस दगडाला धडकली, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; वैभववाडीत झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:44 IST2025-03-26T13:44:23+5:302025-03-26T13:44:54+5:30

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ): तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गावरील खड्डे चुकवताना एसटी बस रस्त्याच्या कडेला ...

ST bus accident in Vaibhavwadi while avoiding potholes | खड्डे चुकवताना एसटी बस दगडाला धडकली, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; वैभववाडीत झाला अपघात

खड्डे चुकवताना एसटी बस दगडाला धडकली, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली; वैभववाडीत झाला अपघात

वैभववाडी (सिंधुदुर्ग): तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गावरील खड्डे चुकवताना एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकली. हा अपघात बुधवारी पहाटे वैभववाडीतील सुकनदीच्या गणपती विसर्जन घाटाजवळ झाला. अपघातात एसटीच्या दर्शनीभागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला.

तळेरे-गगनबावडा रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या सुक नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी येथील वाहतूक सोनाळीतून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तहसिलदार नाका ते सोनाळी गावहद्दीपर्यंत मातीचा भरावं टाकून पर्यायी मार्ग बनविण्यात आला आहे. याच मार्गाने बुधवारी (दि.२६) पहाटे ४ वा धाराशिव-पणजी हिरकणी बस वैभववाडीच्या दिशेने येत होती. शुक नदीवरील विसर्जन घाटाजवळ गाडी आली असता, चिंचोळ्या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे चुकवताना एसटी बस थेट रस्त्याकडे असलेल्या दगड व झाडाला जाऊन धडकली.

त्याचवेळी चालकाने प्रसंगावधान दाखवविले त्यामुळे बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघातात एसटीच्या दर्शनीभागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. एसटी बाजूला घेतल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला.

ठेकेदाराची बेफिकिरी लोकांच्या जीवावर बेतणारी!

महामार्गाच्या ठेकेदाराने हा पर्यायी मार्ग बनवून दोन महिने झाले. फोंडाघाट बंद केल्यामुळे सध्या या मार्गावर वाहतूक दुप्पटीने वाढली आहे. परंतु, या पर्यायी मार्गानवर महिनाभरापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यापुर्वीही या पर्यायी मार्गावर खड्ड्यांमुळे अनेकदा छोटेमोठे अपघात तसेच वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, या खड्ड्यांकडे संबंधित ठेकेदार, महामार्ग प्राधिकरण किंबहुना स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: ST bus accident in Vaibhavwadi while avoiding potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.