सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणार १९० पदांची भरती, मराठा समाजाला १४ पदे आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:17 IST2018-12-14T12:09:06+5:302018-12-14T12:17:55+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १९० पदे रिक्त असून त्यात आरोग्य, अभियंता व ग्रामसेवक या संवर्गाची पदे सर्वाधिक आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणार १९० पदांची भरती, मराठा समाजाला १४ पदे आरक्षित
सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकाचवेळी ग्रामविकास विभागाकडील ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्गजिल्हा परिषदेत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १९० पदे रिक्त असून त्यात आरोग्य, अभियंता व ग्रामसेवक या संवर्गाची पदे सर्वाधिक आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत २३ विभागात १२९२ पदे मंजूर असून त्यातील १११९ पदे भरलेली आहेत. १६ मे २०१८ पर्यंत १५८ पदे रिक्त होती. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत अजून १५ तर ३१ मे २०१९ पर्यंत अजून १७ अशी एकूण १९० पदे रिक्त होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत यातील १६ विभागात रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाºया पदांची यादी निश्चित केली आहे. १९० पदे रिक्त जाणार आहेत.
या मेगा भरतीत सर्वच रिक्त जागा भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हि सर्व पदे भरली जाणार आहेत. मराठा समाजाला नोकरीत १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रथम शासकीय भरती होत आहे. त्यामुळे विशेषत: मराठा समाजाच्या या भरतीत जास्त अपेक्षा आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागात खुल्या असलेल्या आरक्षणात १६ टक्के पदे मराठा समाजाला आरक्षित राहणार आहेत. एकूण पदांच्या १६ टक्के आरक्षण नाही. त्यामुळे १९० पदामध्ये १४ पदे मराठा समाजासाठी आरक्षित राहणार आहेत.
याभरतीत आरोग्य सेवक महिला ४४, आरोग्य सेवक पुरुष २१, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ३२, कंत्राटी ग्रामसेवक ३१, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २७ हि पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने त्याची भरती मोठी होणार आहे. औषध निर्माण अधिकारी ५, वरिष्ठ सहाय्यक ( लेखा ), ५, पर्यवेक्षिका १, विस्तार अधिकारी ( कृषी ) १, पशुधन पर्यवेक्षक १०, कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) २, कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ), कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) ७, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, लघुलेखक ( उच्य श्रेणी ) १, आरोग्य पर्यवेक्षक १ अशाप्रकारे हि भरती होणार आहे.
अधीक्षक कृषी कार्यालयात २२१ पदे रिक्त
राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी या अतिमहत्त्वाच्या विभागात अधिकारी व कर्मचारी मिळून २२१ पदे रिक्त आहेत. यात पाच तंत्र अधिकारी, एक सहाय्यक प्रशासन अधिकारी, २२ कृषी अधिकारी, एक अधीक्षक, तीन सहाय्यक अधिकारी, तीन वरिष्ठ लिपिक, २७ लिपिक, एक लघुलेखक निम्न, दोन लघुटंकलेखक, एक आरेखक, ३९ अणुरेखक, २७ पर्यवेक्षक , ३७ कृषी सहाय्यक, ७ वाहन चालक, एक टिलर आॅपरेटर, २३ शिपाई, १५ नर्सरी सहाय्यक व तीन प्रथम श्रेणी मजूर असा रिक्त पदांत समावेश आहे. एकूण ५६८ मंजूर पदे असून त्यातील ३४७ पदे भरलेली आहेत. होणाºया संभाव्य भरतीत किती भरती होते ? हे महत्वाचे आहे.
लवकरच १९० पदांसाठी भरती होणार : पराडकर
शासनाने आता नोकर भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मधील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील १९० पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्थायी समिती सभेत दिली.