सिंधुदुर्ग : मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध, धनगर समाजबाधंव आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:29 IST2018-10-09T17:27:59+5:302018-10-09T17:29:59+5:30
धनगर समाजावर गेल्या ६८ वर्षापासून होणारा अन्याय दूर करावा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध केला.

धनगर समाजाला एस.टी आरक्षणात लागू करावे याप्रमुख मागणीसाठी ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून धनगर बांधवांनी सा-यांचेच लक्ष वेधले. (छाया : विनोद परब)
सिंधुदुर्गनगरी : धनगर समाजावर गेल्या ६८ वर्षापासून होणारा अन्याय दूर करावा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध केला.
येळकोट येळकोट - जय मल्हार, धनगड दाखवा नाही तर श्राद्ध घाला आदी गगनभेदी घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली. या मोर्चात गजानृत्य लक्षवेधी ठरले. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना सादर करण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन देवूनच भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु धनगर आरक्षणाला अद्यापही केंद्र सरकार कडून हिरवा कंदील मिळाला नाही. सरकारच्या याच नाकर्तेपणा विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी धनगर समाज एस.टी.आरक्षण कृती समितीचे मुख्य संघटक सुरेश झोरे, किशोर वरक, संतोष पटकारे, कान्हू शेळके, सुर्यकांत बोडके, संतोष साळसकर, बाबू हुंबे, विलास जंगले, दिपा ताटे, शितल भराडे यासह विद्यार्थी, महिला, असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झालेला मोर्चा दीड वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गजा नृत्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी सरकारवर जहरी टीका करून निषेध करण्यात आला. त्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
धनगर वेषभूषा वेधून घेत होते सर्वांचे लक्ष
धनगर समाजला अनुसूचित जमाती चे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मंगळवारी सकाळ पासून ओरोस रवळनाथ मंदिरात धनगर समाज बांधव गोळा होत होते. यात पुरूषां बरोबरच महिला व विद्यार्थी वर्गाची संख्या लक्षणीय होती. लहान मुले शालेय गणवेश परिधान करून आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरली होती. पौढ आपल्या पारंपरिक धनगर वेशभूषेत दिसत होते. लाल पांढºया रंगाचे झगे, पागोटे आदी पेहरावात समाज बांधव दिसत होते.