सिंधुदुर्ग : शेर्ले येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 13:08 IST2018-08-30T13:06:39+5:302018-08-30T13:08:36+5:30
निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवित गाडीवर ताबा मिळविल्याने व प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला.
बांदा : निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवित गाडीवर ताबा मिळविल्याने व प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. निगुडे येथे जाणारा रस्ता हा खूपच अरुंद आहे.
याविषयी माहिती अशी की, निगुडे, शेर्ले, रोणापाल व मडुरा भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी निगुडेमार्गे मडुरा जाणारी ही सावंतवाडी एसटी स्थानकातून सकाळी ६ वाजता सुटते. सकाळी ६ च्या दरम्याने निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे ही बस आली असता वेगाने येणाºया दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. हा अपघात मंगळवारी सकाळी ७ च्या दरम्यान घडला.
या अपघातामुळे बसफेरी अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी पायपीट करून बांदा गाठले. यावेळी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे सफाईची मोहीम तत्काळ हाती न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महिन्याभरातील दुसरी घटना, रस्ता धोकादायक
पंधरा दिवसांपूर्वीच तेलीवाडी येथील अंकुश राणे यांच्या घराशेजारी धोकादायक वळणावर दुचाकीला बाजू देताना एसटीला अपघात झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीनच धोकादायक बनला आहे.