वैभववाडीत खळबळ; आचिर्णेत बंदूकीच्या गोळीने युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 8, 2026 13:18 IST2026-04-08T13:18:56+5:302026-04-08T13:18:56+5:30
रात्रीची घटना; विसंगत माहितीमुळे संशयाचे वातावरण

वैभववाडीत खळबळ; आचिर्णेत बंदूकीच्या गोळीने युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यातील आचिर्णे घाणेगड येथे रात्री बंदूकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला कणकवलीत दाखल केले आहे. दरम्यान ते शिकारीसाठी गेले असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत असून जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम व स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरुन विसंगत माहिती मिळत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरुन मिळिलेल्या माहितीनुसार आचिर्णे घाणेगड येथील काहीजण मंगळवारी(ता.७) रात्री शिकारीसाठी गेले होते. त्यातील सागर सुरेश पोटळे (३१) याचा बंदूकीची गोळी लागून जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा सुरेश कातकर(२७) गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, नयोमी साटम घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमकी गोळी कशी लागली? त्यावेळी घटनास्थळी कितीजण होते. हे स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरुन काहीशी विसंगत माहिती मिळत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.