सिंधुदुर्गात तिन्ही राणेंच्या चक्रव्युहात अधिकारी अडकले!
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 12, 2025 18:05 IST2025-04-12T18:02:17+5:302025-04-12T18:05:10+5:30
महेश सरनाईक सिंधुदुर्ग : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रशासनातील ३५ ...

सिंधुदुर्गात तिन्ही राणेंच्या चक्रव्युहात अधिकारी अडकले!
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रशासनातील ३५ ते ४० वर्षांचा दांडगा अनुभव, पालकमंत्री नितेश राणे यांची काम करण्याची अफाट गती आणि आमदार नीलेश राणेंनी प्रशासकीय कारभाराचे पाँईट टू पाँईट केलेले विवेचन अशा तिन्ही राणेंच्या चक्रव्युहात जिल्ह्यातील अधिकारी पुन्हा एकदा अडकलेले आढळले.
जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्वच सत्ताधारी पक्षाचे असल्याने विरोधी पक्षाची भूमिका कोण बजावणार ? असे वाटत असताना आमदार नीलेश राणे यांनी दोन्ही भूमिका बजावल्याने जिल्ह्याचा कारभार हाकताना आपल्यावर आगामी काळात नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकाऱ्यांच्या कारभारात नक्कीच सुधारणा होईल, अशी आशा यानिमित्ताने वाटू लागली आहे.
जिल्हा नियोजनातील अहवालात असणाऱ्या चुका, पारूप आराखड्यातील ठरावापासून सभेचे इतिवृत्त लिहिण्यापर्यंत असणाऱ्या चुकांवर बोट ठेवत आमदार नीलेश राणे यांनी सभेच्या सुरूवातीपासूनच तांत्रिक चुका दाखविताना आपण सत्ताधारी असलो तरी कारभारात कसलीच तडजोड खपवून घेणार नसल्याचे दाखवून दिले. तर गेली ४० वर्षे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनातील दांडगा अनुभव असणाऱ्या खासदार नारायण राणे यांनी समितीचे सचिव जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना वेगवेगळ्या पातळीवर सूचना करताना नियोजनचा निधी अखर्चित ठेवणाऱ्यांना पाठीशी घालू नका असे सांगत अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण केलेल्या कामाची चुणूक दाखवून दिली.
पालकमंत्री तथा जिल्हा नियोजनचे अध्यक्ष नितेश राणे यांनी पहिल्यापासूनच जिल्हा नियोजनचा यापुढील कारभार खूपच पारदर्शी असेल. १०० टक्के निधी डिसेंबरपर्यंतच खर्च होईल असे सांगताना आपण आर्थिक शिस्त लावण्यासाठीच काम करत आहे. निधी अखर्चित राहता कामा नये, यासाठी कडक भूमिका घेणार, हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
ड्रग्सची घुसखोरी, अवैध व्यवसायांची कीड
आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील वाढती ड्रग्सची घुसखोरी, कर्नाटकातून येणारे बीफ यातून जिल्ह्याला अवैध व्यवसायांची कीड लागली आहे. यावर प्रकाशझोत टाकताना पोलिस यंत्रणेच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सभागृहात येवून आपली आणि पोलिस खात्याची भूमिका स्पष्ट करताना ड्रग्सविरोधी कारवाईत कुठलाही कर्मचारी आढळल्यास त्याची चौकशी लावली जाईल, असे आश्वस्त केले.
लोकमान्य टिळकांचा स्टॅच्यू, राणेंची संकल्पना
सभेच्या शेवटी नारायण राणे यांनी पर्यटन विकासाबाबतच्या संकल्पना मांडताना किनारपट्टीच्या तालुक्याकडे आणि आंबोली हिलस्टेशनकडे जाणारा रस्ता सुसज्ज व्हावा, गुजराथमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूप्रमाणे लोकमान्य टिळक यांचा स्टॅच्यू किनारपट्टनजिक उभारावा आणि तिलारीमध्ये सुसज्ज उद्यान उभारावे अशा सूचना करत सभा गोडीगुलाबीने संपविली.