Sindhudurg Nagar Parishad Election Result 2025: राणेंचे गड गेले, पण...! कणकवली, मालवणमध्ये भाजपचा पराभव; वेंगुर्ला, सावंतवाडी जिंकले
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 21, 2025 12:54 IST2025-12-21T12:50:16+5:302025-12-21T12:54:48+5:30
सावंतवाडी, वेंगुर्ल्यात भाजप : मालवणात शिंदेसेना तर कणकवलीत शहर विकास अघाडीचा विजय

Sindhudurg Nagar Parishad Election Result 2025: राणेंचे गड गेले, पण...! कणकवली, मालवणमध्ये भाजपचा पराभव; वेंगुर्ला, सावंतवाडी जिंकले
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री नितेश यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने मोठे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन नगराध्यक्ष पदे भाजपने मिळवली असून शिंदेसेनेने एक आणि शहर विकास आघाडीने एक पद मिळविले. महाविकास आघाडीच्या हाती मात्र, भोपळा आला आहे.
सावंतवाडी नगराध्यक्षपदी भाजपाच्या श्रद्धाराजे भोसले आणि वेंगुर्ला नगराध्यक्षपदी भाजपचे राजन गिरप यांनी बाजी मारली आहे. मालवण नगरपरिषदेमध्ये शिंदेसेनेच्या ममता वराडकर यांनी बाजी मारली आहे. तर बहुचर्चित कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांनी भाजपाच्या समीर नलावडे यांचा पराभव करून आघाडी घेतली.
कणकवलीत नीलेश राणेंची नितेश राणेंवर बाजी
कणकवली नगरपंचायतीत अतिशय अटीतटीची लढाई झाली. शहरविकास आघाडीला शिंदेसेनेने पाठिंबा दिला होता. भाजपाविरोधात सर्वपक्ष याठिकाणी एकवटले होते. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे विरोधात आमदार नीलेश राणे या दोन सख्ख्या भावांसाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची होती. यात शहरविकास आघाडीच्या संदेश पारकर यांनी भाजपाच्या समीर नलावडे यांचा पराभव केल्यामुळे नीलेश राणेंनी नितेश राणेंवर बाजी मारली आहे.
दीपक केसरकरांना धक्का
शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन्ही नगरपरिषदेत भाजपाने नगराध्यक्षांसह नगरसेवक निवडीतही एकहाती सत्ता स्थापन केल्यामुळे दीपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.