सिंधुदुर्ग : तिहेरी अपघातात दोघे गंभीर, साळेल-नांगरभाट येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:40 IST2018-08-25T16:37:46+5:302018-08-25T16:40:26+5:30
मालवण-कसाल राज्यमार्गावरील साळेल-नांगरभाट येथे एसटी, डंपर व दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला अनिकेत मेस्त्री (२६, रा. नांदोस) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

साळेल-नांगरभाट येथे एसटी, डंपर व दुचाकी असा तिहेरी अपघात झाला.
मालवण : मालवण-कसाल राज्यमार्गावरील साळेल-नांगरभाट येथे एसटी, डंपर व दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला अनिकेत मेस्त्री (२६, रा. नांदोस) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुचाकीचालक द्वारकानाथ भोगले (२५, रा. मडुरा-सावंतवाडी) यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात दुपारी तीन वाजता घडला.
मालवण एसटी आगाराची कसाल-मालवण बसफेरी घेऊन विजय केळुसकर हे दुपारी मालवणच्या दिशेने येत होते. याचवेळी हिवाळे येथून दत्ता सामंत यांच्या मालकीचा डंपर चिपीच्या दिशेने खडी घेऊन जात होता.
यावेळी साळेल नांगरभाट येथील रस्त्यावर एसटी चालकाने डंपरला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचवेळी मालवणहून कसालच्या दिशेने जाणारी दुचाकी समोर आली. एसटी चालकाने त्यांना वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटीचालक व दुचाकीचालक या दोघांनाही गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकीची एसटीस पुढील बाजूस जोरदार धडक बसली.
याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या डंपरने एसटी बसला मागाहून धडक दिली. त्यामुळे एसटीचेही नुकसान झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सुनील वेंगुर्लेकर, अमोल महाडिक, महिला पोलीस गंगा येडगे, दीक्षा गोसावी आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अनिकेतची प्रकृती चिंताजनक
अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यातील दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या अनिकेत मेस्त्री याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली, तर चालक द्वारकानाथ भोगले यालाही गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तत्काळ चौके येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी त्यांच्यावर उपचार केले. यातील अनिकेत मेस्त्री याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.