सिंधुदुर्ग : इळये पुलाला निधी मिळणार, प्रमोद जठार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:19 IST2018-08-07T16:17:11+5:302018-08-07T16:19:53+5:30
जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाला नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

माजी आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाच्या जागेची बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून चर्चा केली. यावेळी संतोष किंजवडेकर, जयदेव कदम आदी उपस्थित होते.
देवगड : जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाला नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांची देवगड, जामसंडे तसेच इळये पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी असलेल्या जामसंडे वळकू पाटकरवाडी ते इळये वरंडवाडी या पुलाच्या जागेची जठार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चौंडे यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी या पुलासाठी नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती जठार यांनी दिली.
माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांनी सर्वप्रथम प्रयत्न करून या पुलासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर माजी आमदार अॅड. अजित गोगटे, प्रमोद जठार यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, आघाडी शासनाच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष झाले होते.
हा पूल झाल्यानंतर देवगड व इळये पंचक्रोशीतील गावांमधील अंतर कमी होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
भाजप सरकार असल्याने पुलाच्या मंजुरीला चालना
केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर या पुलासाठी प्रयत्न सुरू केले, असे जठार यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.
त्याला यश आले असून बांधकाममंत्र्यांनी या पुलासाठी नाबार्डमधून साडेपाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या पुलाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनीही वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्याही प्रयत्नांना यश आले आहे.