सिंधुदुर्ग : सूक्ष्म सिंचनचा आराखडा करा : दीपक केसरकर यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:33 IST2018-09-06T17:31:01+5:302018-09-06T17:33:41+5:30
तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : सूक्ष्म सिंचनचा आराखडा करा : दीपक केसरकर यांचे आदेश
सिंधुदुर्गनगरी : तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हा सूक्ष्म सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आराखडा सादर करण्याचे निर्देश वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
तिलारी प्रकल्पात येणाऱ्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासंदर्भात मंत्रालयात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
केसरकर म्हणाले, तिलारी प्रकल्प हा आंतरराज्य प्रकल्प असून या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील ५६०० हेक्टर क्षेत्रात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यात यावा. यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार करावा. तसेच या पद्धतीनेच इतर तालुक्यांत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासाठी आराखडे तयार करून कार्यवाही करावी.
या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता मकरंद मॅकेल, राजेश धागतोडे, जैन सिंचनचे मधुकर फुके, आमदार वैभव नाईक आदींबरोबरच संबंधित अधिकारी उपस्थित होते.