‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:54 IST2025-12-10T16:49:20+5:302025-12-10T16:54:03+5:30
Sindhudurg Crime News: एका तरुण, तरुणीने एकत्र धरणात उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या तरंदळे येथील धरणात उडी मारून जीवनाचा शेवट केला.

‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
एका तरुण, तरुणीने एकत्र धरणात उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या तरंदळे येथील धरणात उडी मारून जीवनाचा शेवट केला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास उघडकीस आली. यातील मृत तरुण हा २२ वर्षांचा तर तरुणी १८ वर्षांची होती. या दोघांनीही जीवन का संपवलं, या मागचं नेमकं कारणं मात्र समोर आलेलं नाही.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या प्रकरणातील मृत तरुण हा कणकवली तालुक्यामधील कलमठ या गावातील आहे. तर तरुणी ही कणकवली शहरातील आहे. आपला मोबाईल हरवल्याचे सांगून हा तरुण काल त्याच्या काकांची दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. दरम्यान, बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो सापडला नाही. याचदरम्यान, सदर तरुणाने त्याच्या आईच्या मोबाईलवरून ‘आपण तरंदळे धरणावर फिरायला जाऊया’ असा मेसेज व्हॉट्सॲपवरून एका तरुणीला केल्याचे आढळून आले.
त्या मेसेजच्या आधारावर शोध घेत सदर तरुणाच्या नातेवाईकांनी तरंदळे धरणाच्या परिसरात धाव घेतली. तिथे शोधाशोध केली असता धरणाच्या पाण्यात सदर तरुण आणि तरुणीचा मृतदेह सापडला. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी मृत तरुणाच्या काकांनी फिर्याद दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.