सिंधुदुर्ग : दारिस्तेतील तरुणीचा दिगवळेतील नदीत मृतदेह, आत्महत्या की घातपात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:06 IST2018-07-24T17:03:51+5:302018-07-24T17:06:07+5:30
कणकवली तालुक्यातील दारिस्ते-गुरववाडी येथील अंकिता रवींद्र गुरव (२०) हिचा मृतदेह दिगवळे येथील नदीपात्रात झुडपांना अडकलेला आढळून आला. ती रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आढळला. मात्र, तिची आत्महत्या की घातपात याबाबत चर्चेला परिसरात उधाण आले आहे.

सिंधुदुर्ग : दारिस्तेतील तरुणीचा दिगवळेतील नदीत मृतदेह, आत्महत्या की घातपात ?
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील दारिस्ते-गुरववाडी येथील अंकिता रवींद्र गुरव (२०) हिचा मृतदेह दिगवळे येथील नदीपात्रात झुडपांना अडकलेला आढळून आला. ती रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास आढळला. मात्र, तिची आत्महत्या की घातपात याबाबत चर्चेला परिसरात उधाण आले आहे.
तिचे वडील रवींद्र गुरव यांनी आपली मुलगी अंकिता बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी सायंकाळी पोलीस स्थानकात दिली होती. सायंकाळनंतर नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. पाण्यात बुडून मृत्यू अशी पोलिसांत नोंद आहे. अंकिताने आत्महत्या केली की ती पाय घसरून नदीत पडली याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून तिचा कुणीतरी घातपात केला असावा, अशी चर्चाही परिसरात सुरू आहे.
अंकिता ही कणकवलीतील एका झेरॉक्स सेंटरमध्ये कामाला होती. रविवार असल्यामुळे झेरॉक्स सेंटरच्या मालकाने तिला दुपारी १२.३० च्या दरम्यान घरी जायला सोडले. ती सायंकाळपर्यंत घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी झेरॉक्स सेंटरच्या मालकांकडे चौकशी केली. अंकिता दुपारी १२.३० वाजताच घरी गेल्याचे झेरॉक्स सेंटरच्या मालकाने सांगितले.
सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास दिगवळे-गावडेवाडी येथील के. टी. बंधाऱ्यापासून नदीपात्रात २०० मीटर अंतरावर पळसकोंड येथे अंकिताचा मृतदेह शेरणीच्या झाडाला अडकलेला आढळला. अंकिताच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शोधमोहिमेला पुन्हा सुरुवात
अंकिता रविवारी दुपारी झेरॉक्स सेंटरमधून घरी यायला निघाली तर सायंकाळपर्यंत घरी का आली नाही म्हणून पालक चिंतेत पडले. शेवटी ग्रामस्थांनी नदीत शोधमोहीम सुरू केली. मात्र रात्र झाल्यामुळे नदीत काही दिसत नसल्यामुळे रात्री ८.३0 च्या दरम्यान शोधमोहीम थांबविली. सोमवारी सकाळी ६.३0 नंतर शोधमोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली.