एकी दाखवा, अन्यथा काजूचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही : गणेश हिमगिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:41 IST2019-05-06T16:39:50+5:302019-05-06T16:41:56+5:30
तळवडे : काजूवरचा व्हॅट कमी केल्याने बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. याचा फायदा आपल्या काजूला होण्यापेक्षा बाहेरच्या ...

मळगाव येथे काजू बी जीआय मानांकन कार्यशाळेचे उद्घाटन सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. गणेश हिमगिरे, गुरूनाथ पेडणेकर, व्हिक्टर डान्टस आदी उपस्थित होते.
तळवडे : काजूवरचा व्हॅट कमी केल्याने बाहेरचा काजू मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. याचा फायदा आपल्या काजूला होण्यापेक्षा बाहेरच्या देशातील काजूला अधिकचा झाला आहे. त्यामुळे आता यापुढे काजू बी जीआय मानांकनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच ब्रँड तयार होईल. अन्यथा आपल्या काजूची अवस्था कांद्यासारखी होईल, असा इशारा अनेक वस्तंूना जीआय मानांकन मिळवून देणारे सांगली येथील प्रा. गणेश हिमगिरे यांनी दिला आहे.
ते मळगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगिरथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काजू बी जीआय मानांकन कार्यशाळेत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्हिक्टर डान्टस, प्रमोद कामत, प्रमोद धुरी, गुरूनाथ पेडणेकर, माजी अध्यक्ष गजानन गावडे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर बांदेकर, सुधाकर नेरूरकर, एकनाथ नाडकर्णी, मनीष दळवी आदी उपस्थित होते.
हिमगिरे पुढे म्हणाले, काजू उत्पादनाला अधिक किंमत जागतिक बाजारपेठेत मिळवायची असल्यास काजू पिकास जीआय मानांकन प्राप्त करणे आवश्यक आहे. एकजूट ठेवल्यास आपण आपले शेती उत्पादन जागतिक बाजारपेठेत नेऊ शकतो. काजू शेतकऱ्यांची संघटना मजबूत करा. तरच आपण आपले उत्पादन टिकवू शकतो. आज केरळचा काजू परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. याचे कारण म्हणजे केरळ काजू जीआय मानांकन प्राप्त आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादनातून दरवर्षी १२०० ते १३०० कोटी रुपयांची उलाढाल होते. पण कोकणातील शेतकरी जागतिक जीआय मानांकनापासून अनभिज्ञ असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यशाळेचे उद्घाटन गणेश हिमगिरे व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. हिमगिरे यांचा जिल्हा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी आत्माराम ओटवणेकर, प्रकाश गवस, दादा साईल आदी उपस्थित होते.
काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्ज
सतीश सावंत म्हणाले, जीआय मानांकनामुळे आपण आपला काजू जागतिक बाजारपेठेत अधिक दराने विकू शकतो. यासाठी शेतकरीवर्गाने एकजूट दाखविणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू शेतकरीवर्गास जिल्हा बँक प्रति काजू झाड ६०० रुपये कर्ज देण्यात येणार आहे. तर जीआय मानांकन प्राप्त काजू झाडाला ७०० रुपये कर्ज देणार, असे यावेळी सावंत यांनी जाहीर केले. यासाठी नवीन योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.