गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 19:31 IST2025-08-17T19:31:10+5:302025-08-17T19:31:41+5:30

ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे  सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते.

Senior socialist leader and former MLA from Kankavli-Malvan Dr. Yashwantrao Babaji Dalvi passes away | गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन 

गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन 

कणकवली: ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली-मालवणचे माजी आमदार डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी तथा य. बा. दळवी (वय१००)यांचे रविवारी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. 'आमचे डॉक्टर' या नावाने कणकवली तालुक्यामध्ये सुपरिचीत असणारे डॉ.य. बा. दळवी १९६२साली कणकवली व त्यानंतर १९७८ मध्ये कणकवली - मालवण या विधानसभा मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर निवडून आले होते.

ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे  सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते. १९५३ साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत न राहता थेट आपले कणकवली तालुक्यातील गाव कळसुली गाठले. त्यानंतर कोरोनाच्या साथीमध्ये आजारी पडेपर्यंत अविरत रुग्णसेवा त्यांनी केली. ती तेथील लोकांची गरज आणि परिस्थिती जाणून घेत. अडलेली बाळंतीण आणि सर्पदंशाने बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी रात्री अपरात्री बॅग उचलून ४, ५ मैल ते जात असत.त्यामुळे 'गरिबांचा डॉक्टर' अशी उपाधीही त्यांना मिळाली होती.

आपल्या गावासाठी हायस्कूल आणि ओसरगाव- कळसुली तसेच कणकवली- हळवल- शिरवल मार्गे रस्ते श्रमदान आणि भूदान या मार्गाने त्यांनी विकसित केले.त्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.थोर समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांनी हेरलेले हे रत्न पुढे प्रा. मधु दंडवते यांचा खंबीर साथी म्हणून नावारूपाला आले. कोकणात समाजवादी चळवळीला बळ देण्यात ते आघाडीवर होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. साधना, सुपुत्र ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजीत तसेच कन्या कल्पना कदम, दीया मोरे, सुप्रिया मुलचंदानी तसेच नातवंडे-पतवंडे आहेत. नातू अनिरुद्ध हा सध्या वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

'आपले हे हात सेवेसाठी आहेत, ते आता जरी थकले असले तरी शेवटच्या श्‍वासापर्यंत सेवा करत राहावी असे वाटते. मला दोनवेळा आमदारकी मिळाली, पण त्यात मी रमलो नाही. मंत्री खोटी उत्तरे देतात त्याची मला चीड यायची, ते ऐकावेसे वाटत नव्हते . आमच्या कोकणातील कार्यकर्ते नेक होते, रद्दीवर झोपत आणि उपाशीपोटी काम करत. त्यांच्यासाठी, समाजासाठी मी काही करू शकणार नाही अशी माझी पक्‍की खात्री झाली आणि म्हणूनच आपण वैद्यकीय सेवा करण्याला महत्व दिले. राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे, तसे झाले तर देशाचे भले होईल .आपण अनेक रूग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकलो ते केवळ दैवी पाठबळामुळेच असे डॉ.य.बा. दळवी सांगत असायचे. 

Web Title: Senior socialist leader and former MLA from Kankavli-Malvan Dr. Yashwantrao Babaji Dalvi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.