कणकवली विधानसभा मतदार संघातील सरपंचांना विमा कवच, नीतेश राणे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:42 IST2021-06-07T16:41:00+5:302021-06-07T16:42:44+5:30
Kankavli NiteshRane -मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नीतेश राणे यांनी दिली.

कणकवली विधानसभा मतदार संघातील सरपंचांना विमा कवच, नीतेश राणे यांची माहिती
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंचांना प्रत्येकी ३ लाखांचा आरोग्य विमा आणि ७ लाख ५० हजारापर्यंतचा मोबदला मिळेल असे विमा कवच दिले जाणार आहे. ज्या मतदारांनी मला निवडून दिले आहे त्या सर्वांचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नीतेश राणे यांनी दिली.
नीतेश राणे यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखांचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच रुग्णवाहिकेपासून व्हीआयपी उपचार पद्धती यात लागू होणार आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारही या विमा कवचमध्ये समाविष्ट केले आहेत. एकूण सात ते साडेसात लाख रुपयांचा खर्च देशातील नावाजलेली चोला मंडलम ही प्रसिद्ध विमा कंपनी या उपक्रमाच्या माध्यमातून करणार आहे.
या विमा कंपनीशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत. अजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत. कोरोनामुक्त गावाबरोबरच तो भयमुक्त करणे गरजेचे आहे. सर्वच सरपंच या फ्रंटलाईनवर काम करतात त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. त्यामुळे माझ्या मतदार संघातील सरपंचांपासून सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्हा हा राणे कुटुंबीयांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली की संपूर्ण जिल्ह्यासाठीही निश्चितच विचार करू.
सत्ताधाऱ्यांनी अनुकरण करावे !
माझ्या या कामाचे सत्ताधारी आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी अनुकरण करावे. तसेच त्यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सरपंचांना विमा कवच द्यावे. त्यात ते कमी पडले तर भाजपाच्यावतीने आम्ही सर्व सरपंचांना विमा कवच देऊ. असा टोलाही नीतेश राणे यांनी यावेळी लगावला आहे.