संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे

By सुधीर राणे | Published: February 7, 2024 03:55 PM2024-02-07T15:55:13+5:302024-02-07T15:58:58+5:30

दीपक केसरकर यांचे ठाकरेंबाबतचे आरोप खरे

Sanjay Raut target to break Congress now says MLA Nitesh Rane | संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे

संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे

कणकवली: दुसऱ्यांच्या घरात भांडणे लावण्याचे एकमेव काम संजय राऊत हे करतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात त्यांनी वाद लावले. ते घर फोडले,पक्ष फोडला. आता शरद पवार यांचा पक्ष फोडला. त्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांचे टार्गेट आहे. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे बोलले त्याला माझे समर्थन आहे. उद्धव ठाकरे पदासाठी व आमदारकीसाठी पैसे घेतात. हा आरोप यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रंगशारदा येथील बैठकीत केला होता असेही ते यावेळी म्हणाले. कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी आज, बुधवारी त्यांनी संवाद साधला. 

राणे म्हणाले, अपेक्षे प्रमाणे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि घामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवली त्या अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना हा निर्णय सुखावणारा होता तसा तो संजय राऊत यांनाही आनंद देणारा आहे. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे होवू शकले नाहीत. त्यामुळे ते कोणाचेच होणार नाहीत. आता त्यांचा काँग्रेस पक्ष फोडण्यावर डोळा आहे. 

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात वाद लावण्याचा प्रयत्न 

तसेच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात वाद लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यसभेची सहावी जागा छत्रपती संभाजी राजे यांना द्यावी अशी चर्चा चालू असताना दुसऱ्याचेच नाव चालविण्याचे काम राऊत करत आहेत. आधी ठाकरे आणि आता पवार यांच्या घरात यशस्वीपणे वाद त्यांनी लावले आहेत. 

'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा..' आता समजले असेल

'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा..' असे सुप्रिया सुळे म्हणत होत्या. त्यांना आता 'अकेला फडणवीस काफी है' हे समजले असेल. ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ त्यानीच तुमच्यावर आणली आहे, हे आता कळले असेल. असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या जनतेच्या विरुद्ध जाऊन गद्दारांचा खजिना महाविकास आघाडीने निर्माण केला होता. त्यामुळे आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी बोलू नये. हिंदुत्वाच्या विचाराचे सर्व पक्ष एकत्र येत असतील तर मनसेनेचे स्वागत आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.  कोकणातील जनता उद्धव ठाकरेंना आपला कुटुंब प्रमुख मानत नाही. हे  येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. असेही नितेश राणे म्हणाले.

Web Title: Sanjay Raut target to break Congress now says MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.