Sindhudurg: आरोंदा परिसरात अनधिकृत वास्तव्य, रशियन पर्यटकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:23 IST2025-08-20T12:06:03+5:302025-08-20T12:23:11+5:30
अमली पदार्थ विक्रीचा संशय

Sindhudurg: आरोंदा परिसरात अनधिकृत वास्तव्य, रशियन पर्यटकाला अटक
सावंतवाडी : गोव्याच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथे अनधिकृतपणे वास्तव्य करत असलेल्या युरी वॅल्डीमोरीविझ मोजको (४४, रा. रशिया) या रशियन पर्यटकाला अमलीपदार्थांची तस्करी करत असल्याच्या संशयावरून सावंतवाडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ आढळून आले नसल्याने पोलिसांकडून त्याला आरोंदा येथे अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडे पोलिस तपासणीवेळी कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. ही कारवाई पोलिसांकडून मंगळवारी सकाळी करण्यात आली असून, युरी याला ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
याबाबत माहिती अशी युरी हा रशियन पर्यटक गोवा-हरमल येथे आला होता. त्याला महाराष्ट्रातील आरोंदा हे गाव जवळ असल्याने तसेच शिरोडा, वेळागर, रेड्डी येथील बीच जवळ असल्याने त्याचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला होता. आरोंदा येथील स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आरोंदा येथे गेले. त्यांनी या रशियन पर्यटकाला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो आरोंदा- रेडकरवाडी येथे अमलीपदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच पोलिसांकडून छापा टाकण्यात आला होता.
परंतु त्याच्याकडे काहीच आढळले नाही. त्यामुळे त्याच्यावर अनधिकृतरीत्या वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खंदरकर, पंकज शिंदे, हवालदार महेश अरवारी, पोलिस महेश परब, सुरेश पाटील आदींकडून करण्यात आली.