वाढत्या उष्म्यामुळे रस्ते पडले ओस, सावंतवाडीत जलस्त्रोत आटण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:18 IST2026-03-16T19:17:32+5:302026-03-16T19:18:27+5:30
विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे

वाढत्या उष्म्यामुळे रस्ते पडले ओस, सावंतवाडीत जलस्त्रोत आटण्याच्या मार्गावर
अनंत जाधव
सावंतवाडी : यंदा महिन्याच्या मध्यान्हातच जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी १० वाजताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. दुपारी १२ नंतर उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांअभावी रस्ते ओस पडले आहेत.
कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक नदी-नाले आतापासूनच कोरडे पडू लागले असून, ग्रामीण भागातील विहिरींची पातळी झपाट्याने खालावत आहे.
दुसरीकडे शहरात रस्त्यावर व्यवसाय करणारे चप्पल-बूट शिवणारे कारागीर, फळ विक्रेते, बाजार समितीमधील हमाल, तीनचाकी रिक्षाद्वारे मालवाहतूक करणारे मजूर, तसेच बांधकामावरील कामगारांना कडक उन्हात काम करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण भागातील काही विहिरींची पातळी खाली गेली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.