बांदा येथे दरड कोसळली
By Admin | Updated: July 14, 2014 00:02 IST2014-07-13T23:58:21+5:302014-07-14T00:02:16+5:30
वाहतूक विस्कळीत : चिखलात व्हॅन अडकली

बांदा येथे दरड कोसळली
बांदा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे काल रात्री एक वाजता दरड कोसळल्याने चिखलात पिक अप व्हॅन अडकून पडली. बांदा ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेत व्हॅनला सुरक्षित बाहेर काढले. दरडीसोबत सिमेंट काँक्रिटची मजबूत बांधकाम असलेली संरक्षक भिंत देखिल कोसळल्याने महामार्ग पूर्णपणे खचला आहे. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
महामार्गावरील दरड कोसळलेला डोंगर धोकादायक स्थितीत असल्याने याठिकाणी सिमेंटची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. मात्र, यावर्षी डोंगरात पावसाचे पाणी साचल्याने दोन दिवसांपूर्वीच डोंगरातील काही मातीचा भाग रस्त्यावर आला होता. महामार्गालगतचे गटार माती जाऊन बुजल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात डोंगरातील माती मोठ्या प्रमाणात महामार्गावर आली. यामुळे सिमेंटची संरक्षक भिंत देखिल कोसळली. याठिकाणी चौपदरी महामार्ग असल्याने गोव्याहून बांद्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आज सकाळी महामार्गावरील काही माती काढण्यात आली. मात्र आज दिवसभरात बहुतेक वेळा माती रस्त्यावर येत होती.
मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आल्याने डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खचला आहे. स्थानिकांनी याची कल्पना बांधकाम खात्याला दिली आहे. मात्र, सायंकाळपर्यंत या खात्याचा एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.
याठिकाणच्या डोंगरातील माती कोसळण्याच्या स्थितीत असून सार्र्वजनिक बांधकाम खात्याने डोंगरातील माती तातडीने
बाजूला करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)