दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेताना रिक्षा उलटली!, दोडामार्ग येथे घडला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:01 IST2022-12-28T19:00:36+5:302022-12-28T19:01:57+5:30
संदेश देसाई दोडामार्ग : दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेत असताना दोडामार्ग येथे रिक्षा उलटून अपघात झाला. अपघातात चालक विश्वनाथ ...

दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेताना रिक्षा उलटली!, दोडामार्ग येथे घडला अपघात
संदेश देसाई
दोडामार्ग : दोन महिन्याच्या चिमुकलीला डॉक्टरकडे नेत असताना दोडामार्ग येथे रिक्षा उलटून अपघात झाला. अपघातात चालक विश्वनाथ पंडित (वय ५२) व संचिता कविटकर (४९) यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने आई व दोन्ही मुली सुखरूप आहेत. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास दोडामार्ग ग्रामीण रुग्णालया जवळ हा अपघात झाला. रिक्षातून आई, दोन महिन्याची मुलगी व सहा वर्षांची मुलगी तसेच आत्या हे चौघे बांदा कास येथून दोडामार्ग मार्गे बिचोलीकडे प्रवास करीत होते.
याबाबत माहिती अशी की, बांदा कास येथील कल्याणी सावंत हिला आपल्या मुलीला तपासणीसाठी बिचोली येथे न्यायचे होते. त्यांच्या मावशीचे पती विश्वनाथ पंडित यांची रिक्षा आहे. त्या रिक्षातून कल्याणी, तिची आत्या संचिता कविटकर यांच्यासह दोन मुलींना घेऊन बांदा कास येथून निघाले.
दरम्यान, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालया जवळ रिक्षा आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षा चालक विश्वनाथ पंडित यांच्या डोक्याला तर संचिता कविटकर यांच्या पायाला मार लागला. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
आत्याने चिमुकलीला सावरले!
रिक्षाने प्रवास करीत असता कल्याणी सावंत हिने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीला आत्या जवळ दिले होते. अपघात घडत असल्याचे लक्षात येताच आत्या संचिता हिने चिमुकलीला पोटाशी धरून तिला सावरले. यात आत्याला किरकोळ दुखापत झाली. आपल्याला दुखापत झाल्याचे दुःख नाही माझी नात सुखरूप आहे यातच देवाचे आभार मानते असे सांगताना आत्याचे अश्रू अनावर झाले.