Sindhudurg: रामेश्वर-कुणकेश्वराची ३९ वर्षांनी झाली शाही भेट; गाठीभेटी घेत आज पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:34 IST2025-02-28T17:33:12+5:302025-02-28T17:34:42+5:30
एक हजार वाळूच्या गोण्या भरून सेतू

Sindhudurg: रामेश्वर-कुणकेश्वराची ३९ वर्षांनी झाली शाही भेट; गाठीभेटी घेत आज पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतले
आचरा : महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून श्री आचरा गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वर यांच्या तब्बल ३९ वर्षांनी शाही भेटीचा अविस्मरणीय सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
श्री देव रामेश्वराच्या स्वारीने तीन तपाच्या कालावधीनंतरही पूर्वपार अशा डोंगर दऱ्यासह खाडीपात्राच्या पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण केले. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे पोहोचल्यानंतर रामेश्वराने मंदिराला तीन प्रदक्षिणा घालून आपला भाऊ श्री देव कुणकेश्वरची भेट घेतली. हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक कुणकेश्वर मंदिरात दाखल झाले होते.
श्री देव रामेश्वर मंदिराकडून बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास निघालेली ही देव स्वारी कुणकेश्वर येथे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पोहोचली. प्रथम देव रामेश्वराची स्वारी श्री देव गांगेश्वर मंदिर येथून निघाली होती.
एक हजार वाळूच्या गोण्या भरून सेतू
गुरुवारी दुपारी श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह भक्तांचा गाठीभेटी घेत आज, शुक्रवारी (दि.२८) पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतले. दरम्यान, देव रामेश्वराच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी रस्त्यांवर सडा रांगोळी करून जागोजागी पताका, रंगीबेरंगी गुढ्या, तोरणे, चलचित्र देखावे उभारले होते. कातवण ग्रामस्थांनी खाडीपात्रात एक हजार वाळूच्या गोण्या भरून सेतू तयार केला होता. समुद्रकिनारी असलेल्या मारुती मंदिराकडून झुलावा नृत्य करत क्षेत्र श्री कुणकेश्वर येथे श्रींची स्वारी दाखल झाली.