Sindhudurg: पावशी येथे संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात, सर्व्हिस रस्ते झाले चिखलमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:37 IST2025-05-26T16:36:08+5:302025-05-26T16:37:40+5:30

महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा; पावशी ग्रामस्थांचा आरोप

Rainwater enters the house due to lack of protective wall in Pavshi Sindhudurg | Sindhudurg: पावशी येथे संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात, सर्व्हिस रस्ते झाले चिखलमय

पावसाच्या पाण्याने सर्व्हिस रस्ते चिखलमय झाले

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी येथील दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा मातीचा भराव टाकण्यात आला. मात्र, संरक्षक भिंत नसल्याने वळिवाच्या पावसाचे पाणी वाहून तेथील घरामध्ये चिखलाचे पाणी शिरले. महामार्ग प्रशासन व संबंधित ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा फटका तेथील ग्रामस्थांना बसला आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली व ग्रामस्थांनी केली आहे.

सर्व्हिस मार्गांच्या कामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली असून अपघात झाल्यास सर्वस्वी महामार्ग प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पावशी बोरभाटवाडी येथे सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला. मात्र, संरक्षक भिंत नसल्याने पहिल्याच मुसळधार पावसाचे पाणी वाहून तेथील महेश पाताडे यांच्या घरात शिरले. मातीचा भराव असल्याने हे चिखलाचे पाणी त्यांच्या घरात शिरून नाल्याचे स्वरूप निर्माण झाले होते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर मातीही वाहून घरात गेली. त्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले.

तेथील तुळसकर, पावसकर, पाटील, राणे यांच्या घरापर्यंत  पाणी शिरले होते. या अचानक उद्भवलेल्या समस्येमुळे तेथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अपघात झाल्यास प्रशासनच जबाबदार

महामार्ग प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणाचा फटका तेथील पाताडे व अन्य कुटुंबांना बसला. सर्व्हिस मार्गांच्या कामामुळे ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेले चार दिवस वळिवाचा पाऊस कोसळून पाण्यासह माती व चिखल तेथील ग्रामस्थांच्या घरात शिरला. तेथील पाय वाटेवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सर्व्हिस मार्गाचे काम सुरू केल्यापासून चार ते पाच अपघात झाले आहेत. यापुढे अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी महामार्ग प्रशासन विभाग आणि संबंधित ठेकेदाराची राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

नुकसान भरपाई द्यावी

ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरून घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाले. या सर्व गोष्टींचा विचार करता संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रशासनावर अंकुश नसल्याने ही वस्तुस्थिती निर्माण झाली. याचा विचार करून संबंधित ग्रामस्थांना त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पावशीचे उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, ग्रामपंचायत सदस्य वसंत भोगटे, गणेश पावसकर, निकीता शेलटे, दिव्या खोत, दिव्या दळवी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Rainwater enters the house due to lack of protective wall in Pavshi Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.