सह्याद्रीच्या पट्ट्यात अवकाळी पावसाची हजेरी, फोंडाघाट येथे पडल्या गारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:36 IST2022-03-09T17:11:07+5:302022-03-09T17:36:15+5:30
फोंडाघाट, लोरे, हरकुळ या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यापासून वादळ वारा आणि नंतर गारांचा जोरदार पाऊस पडला. तर कणकवली शहर परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला होता.

सह्याद्रीच्या पट्ट्यात अवकाळी पावसाची हजेरी, फोंडाघाट येथे पडल्या गारा
कणकवली : गेले दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अखेर अवकाळी पावसाचे आगमन झालेच. कणकवली तालुक्यात मंगळवारपासूनच फार मोठा उष्मा जाणवत होता. बुधवारी दुपारी सह्याद्रीच्या पट्ट्यात तुफान पाऊस कोसळला.
फोंडाघाट, लोरे, हरकुळ या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यापासून वादळ वारा आणि नंतर गारांचा जोरदार पाऊस पडला. आंबोलीतही सायंकाळी गाराचा पाऊस कोसळला. यामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत बनले होते. तर कणकवली शहर परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला होता.
हवामान विभागाने कोकणात ८ व ९ मार्चला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार वातावरणातही बदल झाला होता. सोमवारपासूनच उष्णतेच्या प्रमाणात अचानक वाढ होऊन पारा ४० अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे अचानक उष्णता वाढल्याने पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
आंबा, काजू बागायतदार चिंतेत
बुधवारी झालेल्या या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी उष्णतेचे प्रमाणही फारसे कमी झालेले नाही. या पावसाचा आंबा व काजू पिकावर परिणाम होणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ऐन आंबा, काजूच्या हंगामात पाऊस पडल्याने या दोन्ही पिकांना मोठा फटका बसणार आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.