पोलीस बळाचा वापर करून बांधकामे पाडल्यास आत्मदहन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 15:41 IST2021-02-15T15:40:26+5:302021-02-15T15:41:42+5:30
highway Kankavli sindhudurg- महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पोलीस बळाचा वापर करून पाडण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा कणकवली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिले.

पोलीस बळाचा वापर करून बांधकामे पाडल्यास आत्मदहन करणार
कणकवली : महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पोलीस बळाचा वापर करून पाडण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा कणकवली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिले.
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या अनुषंगाने महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे सोमवार, १५ फेब्रुवारीपासून तोडण्यात येणार आहेत. परंतु काही बांधकामांची प्रकरणे लवादाकडे प्रलंबित आहेत. महामार्ग अधिकाऱ्यांना वारंवार फोनवरून सूचना देऊनही वकिलामार्फत आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडण्याचे सौजन्यही ते दाखवित नाहीत व फोन केला तर संवाद साधत नाहीत. एका बाजूने लोकांना मोबदल्यापासून वंचित ठेवायचे व दुसऱ्या बाजूने पोलिसी बळ, धाकदपटशा दाखवून आपले काम बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवायचे असा प्रकार चालू आहे, असे मांजरेकर म्हणाले.
या मोहिमेवेळी जर अन्याय होणार असेल तर आमच्याकडे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. या अगोदर उपोषण केले होते. तरीही प्रशासनाकडून फारसे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. या मोहिमेमुळे काही विपरीत घडल्यास त्याला महामार्ग प्राधिकरण, कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता मणेर, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा इशाराही मांजरेकर यांनी दिला आहे.
बांधकामांबाबतचे खटले लवादाकडे अजूनही प्रलंबित
महामार्गालगतच्या बांधकामांच्या निवाड्याबाबतचे खटले लवादाकडे ३ वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निकाल मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.
आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी शासनाला भरपूर सहकार्य केले; पण आता मोबदला न देता जर दांडगाईने पोलिसी बळाचा वापर करून बेकायदेशीररित्या बांधकामे पाडली जाणार असतील तर त्याला आमचा विरोध राहील, असेही प्रदीप मांजरेकर यांनी म्हटले आहे.