Sindhudurg Crime: शिकाऱ्यांकडून वनविभाग पथकावर गोळीबार, चौकुळ येथील जंगलात मध्यरात्री घडली चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:28 IST2025-03-27T12:25:37+5:302025-03-27T12:28:25+5:30
मृत ससा, काडतुसे, दुचाकींसह चौघे ताब्यात

Sindhudurg Crime: शिकाऱ्यांकडून वनविभाग पथकावर गोळीबार, चौकुळ येथील जंगलात मध्यरात्री घडली चकमक
आंबोली : चौकुळ इसापूर या जंगलमय भागामध्ये शिकारीसाठी फिरत असलेल्या चौघाजणांना वनविभागाच्या गस्तीपथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. यावेळी संबंधित शिकाऱ्यांकडून वनविभागाच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. यावेळी या शिकाऱ्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शितापणे ताब्यात घेतले. यावेळी या शिकाऱ्यांकडून मृत ससा, बंदूक तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
हे शिकारी नेहमी या जंगलमय परिसरामध्ये शिकारीला येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दशरथ बाबुराव राऊळ (रा. माडखोल ), प्रशांत सदानंद कुबल (रा. कुडाळ), अमोल नामदेव गावडे (रा. खासकीलवाडा चौकुळ), सखाराम चंद्रकांत राऊळ (रा. माडखोल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.
मुद्देमालासह घेतले ताब्यात
आंबोली जंगलात काही शिकारी फिरत असल्याची माहिती शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मध्यरात्री ईसापुर परिसरात हे चौघे संशयास्पदरित्या दिसून आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हातात असलेले बंदूक घेऊन गोळीबार करून त्या ठिकाणी पळून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आहे. त्यांच्याकडे आढळून आलेल्या वाहनाचे तपासणी केली असता एक शिकार केलेला मृत ससा, पाच जिवंत काढतुसे, दोन बॅटऱ्या, दोन मोबाइल एक हेडफोन आणि तीन दुचाकी आधी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हे होते वनपथकात
याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्या असून शासकीय कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई देवसू वनपाल मेहबूब आप्पासो नाईकवडे, मसुरे वनरक्षक संकल्प दिलीप जाधव, तपासणी नाक्यावरील वनरक्षक संग्राम पाटील, वेर्ले वनरिक्षक आदित्य लाड, एकनाथ पारधी, मंगेश सावंत, प्रथमेश गावडे, राकेश अमृतकर आदींच्या पथकाकडून करण्यात आली आहे.
नांगरतास परिसरातही शिकार
आंबोली मधील नांगरतास परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सद्यस्थितीत शिकार होत आहेत. कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणाहून नांगरतास कावळेशेत घाटकरवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकारी मुक्कामात असतात. त्यांच्यावर सुद्धा लगाम घालण्यात यावी व कारवाई करण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमीमधून होत आहे याबाबत वनपरिक्षेत्रपाल यांना माहिती देणार असल्याची माहिती देण्यात आली.