सिंधुदुर्ग : तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, साडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:17 IST2018-07-21T17:13:15+5:302018-07-21T17:17:39+5:30
वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली दस्तऐवजाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाच्या छताला लागलेल्या गळतीमुळे दस्तऐवजावर प्लास्टिकचे आच्छादन घातले. गळतीमुळे कक्षात दलदल निर्माण झाली आहे.
वैभववाडी : तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली दस्तऐवजाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या इमारतीच्या गळतीबाबत तीन वर्षे पत्रव्यवहार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत तहसीलदार संतोष जाधव यांनी व्यक्त केली.
जुने सातबारा, ८ अ, हक्क नोंदणी उतारा, इनामदार पत्रके, जन्म मृत्यू रजिस्टर, कुळ रजिस्टर, जमाबंदी पत्रक, अकृषक परवाने, वाटप पत्रक आदी १९५४-५५ पासूनचे २५ प्रकारचे दस्तऐवज अभिलेख कक्षात ठेवण्यात आले आहेत. या सर्व कागदपत्रांची संख्या ४ लाख ३८ हजार इतकी आहे. अभिलेख कक्षातील या किंमती दस्तऐवजांचे संगणकीकरणाद्वारे अद्ययावतीकरण अद्याप सुरु आहे.
अभिलेख कक्षात छताला सर्वत्र गळती लागली आहे. त्यामुळे संपूर्ण दस्तऐवजावर प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले आहे. त्या प्लास्टिकवरुन पाणी साचले आहे. त्यामुळे अभिलेख कक्षात दलदल निर्माण झाली आहे.
छताची गळती आणि फरशीवरच्या दलदलीत बसून दस्तऐवजाच्या संगणकीकरणाचे काम सुरु असल्याने संगणक परिचालकांना त्रास होत आहे. परंतु, संपूर्ण वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज पाण्यात असताना त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या किंमती दस्तऐवजाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष : तहसीलदार
अभिलेख कक्षाच्या छतावर पत्र्याची शेड उभारण्याबाबत गेले तीन वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गळती सुरु होताच दस्तऐवजांचे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक घातले आहे.
आता पुन्हा बांधकामला स्मरणपत्र काढून जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार संतोष जाधव यांनी सांगितले.