कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, वागदे ग्रामस्थांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:19 IST2025-11-07T16:19:04+5:302025-11-07T16:19:39+5:30
मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा, डॉक्टराना धरले धारेवर

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, वागदे ग्रामस्थांचा आरोप
कणकवली : रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट न करता केवळ गोळ्या, औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे (वय ५३, रा. वागदे, डनगळवाडी ) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. राजेंद्र यांच्या प्लेटलेट्स कमी झालेल्या असतानाही त्यांना एडमिट का करून घेतले नाही ? असा सवाल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरले.
राजेंद्र गावडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होत नाही व नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण तणावपुर्ण बनले होते.
राजेंद्र गावडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गुरूवारी सायंकाळी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उद्या रक्त तपासणी करण्यासाठी या असे सांगितले. परत रुग्णालयात आले असता त्यांना काही चाचण्या करायला सांगितल्या. यात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या ३६००० एवढी आढळली. त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. तरीही केवळ गोळ्या लिहून देऊन येथील डॉक्टरांनी राजेंद्र यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, घरी गेलेल्या राजेंद्र यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच वागदे गावातील ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. राजेंद्र यांना ऍडमिट करून न घेणारे ते डॉक्टर कोण होते? असा सवाल ग्रामस्थांनी केला. तसेच जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक येथे येत नाहीत व संबंधित डॉक्टरवर कारवाई तसेच कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून कणकवली पोलिसही उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याबरोबर ग्रामस्थांची चर्चा सुरु आहे.