मोलकरणीकडून घरमालकाला गंडा, अडीच लाख लंपास, कणकवली-विद्यानगर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:31 IST2018-05-28T15:31:09+5:302018-05-28T15:31:09+5:30
कणकवली शहरातील विद्यानगर येथील घर मालकाला मोलकरणीने अडीच लाखांचा गंडा घातला. कपाटातील २ लाख ५० हजार लंपास करून घर मालकालाच फसविले. याबाबत घर मालकाने विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तिने काम सोडले आहे. ही चोरीची घटना कणकवली-विद्यानगर येथे ६ ते १० मे २०१८ या कालावधीत घडली.

मोलकरणीकडून घरमालकाला गंडा, अडीच लाख लंपास, कणकवली-विद्यानगर येथील घटना
कणकवली : शहरातील विद्यानगर येथील घर मालकाला मोलकरणीने अडीच लाखांचा गंडा घातला. कपाटातील २ लाख ५० हजार लंपास करून घर मालकालाच फसविले. याबाबत घर मालकाने विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तिने काम सोडले आहे. ही चोरीची घटना कणकवली-विद्यानगर येथे ६ ते १० मे २०१८ या कालावधीत घडली.
याबाबत कीर्ती अनंत नागवेकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नयना नारायण तांबे (रा. आंब्रड-बौद्धवाडी, ता. कुडाळ) ही कीर्ती नागवेकर यांच्याकडे मोलकरीण म्हणून २०१४ पासून काम करीत होती.
कीर्ती नागवेकर यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायातील २ लाख ५० हजार रुपये आपल्या मुलाच्या कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवले होते. साधारणत: ६ ते १० मे या कालावधीत हे पैसे नयना हिने चोरले असावेत, असा संशय कीर्ती नागवेकर यांनी व्यक्त केला आहे.
या पैशांबाबत नयना तांबे यांना नागवेकर यांनी विचारले असता नयनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कीर्ती नागवेकर यांचा नयना तांबे यांच्यावरील संशय आणखी बळावला आहे.
नयना तांबे हिला पैशांबाबत विचारल्यापासून नयना हिने कीर्ती नागवेकर यांच्याकडील मोलकरणीचे काम सोडले आहे.
कणकवली पोलिसांनी नयना तांबे यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अजूनही पोलीस नयना तांबे हिच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मात्र या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.