सावंतवाडीत मोती तलावातील 'ऑपरेशन मगर' अद्याप अपयशी, वन विभागाकडून पुन्हा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:10 IST2025-09-03T17:10:27+5:302025-09-03T17:10:50+5:30
सापळा लावला तरी मगरीचे दर्शन

सावंतवाडीत मोती तलावातील 'ऑपरेशन मगर' अद्याप अपयशी, वन विभागाकडून पुन्हा प्रयत्न
सावंतवाडी : मोती तलावातील पहिले ऑपरेशन मगर फेल ठरल्यानंतर आता वन विभागाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन मगर सुरू केले आहे. मात्र, याला किती यश येईल ते पाहावे लागणार आहे. कारण, मगरीने आपले वास्तव्य कारंज्यावर बसवले असून, वन विभागाद्वारे लावलेल्या सापळ्याला ती हुलकावणी देत आहे. त्यामुळे वन विभागाचे जलद कृती दल कामाला लागले आहे.
मोती तलावात असलेल्या या मगरीला पकडण्यासाठी शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. सोमवारपासून मगरीचा माग वन विभागाची टीम काढत असून, मगरीला जरा संशय आला की, ती पाण्यात पळ काढते. त्यामुळे कालचे रेस्क्यू ऑपरेशन अपयशी ठरले. आता पुन्हा एकदा ही टीम मगरीला पकडण्याचा प्रयत्न करणार असून, गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि काळजी घ्यावी, असे आवाहन रेस्क्यू टीमकडून बबन रेडकर यांनी केले आहे.
जेरबंद करण्यात अपयश
उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाने ही मोहीम राबवली आहे. यापूर्वी नागरिकांनी रोष व्यक्त करत संतापही नोंदवला होता, ज्यामुळे उप वनसंरक्षक यांचे लक्ष वेधले गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत जलद कृती दलाचे सदस्य बबन रेडकर, तुषार सावंत, शुभम सावंत आणि सिद्धेश नेमळेकर (सावंत) तलावात उतरून मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मगरीने पाण्यात पळ काढल्यामुळे तिला जेरबंद करण्यात अपयश आले.
नागरिकांनी पाण्यात उतरू नये
बबन रेडकर म्हणाले, नैसर्गिक अधिवासात मगरी आहे आणि त्या परिसरात पाणीही भरलेले आहे. पिंजरा लावूनही ती त्यात येत नाही. माणसाची चाहूल लागताच मगर पळून जाते. आताही काही अंतरावर असताना तिने पळ काढला. माणसाला धोका नाही, मात्र नागरिकांनी पाण्यात उतरू नये व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारंज्याच्या परिसरात वास्तव्य
गेल्या काही दिवसांपासून मगरी कारंज्याच्या परिसरात वास्तव्य करत आहे. ती मध्येच पाण्याच्या बाहेर येते आणि मनुष्याची चाहूल लागल्यास पाण्यात परत जाते. त्यामुळे आता ऑपरेशन मगर वनविभागाचे किती यशस्वी ठरते ते पाहावे लागणार आहे.