Sindhudurg: शुकनदीच्या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू, तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची नामुष्की टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:34 IST2025-05-24T17:33:02+5:302025-05-24T17:34:26+5:30

वाहतूक सुरू पण धोकादायक

One-way traffic begins on newly constructed bridge over Shukanadi connecting Vaibhavwadi city, avoiding the embarrassment of closing the Talere Kolhapur National Highway | Sindhudurg: शुकनदीच्या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू, तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची नामुष्की टळली

Sindhudurg: शुकनदीच्या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू, तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची नामुष्की टळली

वैभववाडी : वैभववाडी शहराला जोडणाऱ्या शुकनदीवर नव्याने बांधलेल्या पुलावरून शुक्रवारी दुपारनंतर एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद होण्याची नामुष्की टळली आहे. दरम्यान, पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होण्यास आठवडा जाण्याची शक्यता आहे.

तळेरे-कोल्हापूर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम दीड वर्षे सुरू आहे. या मार्गावरील शांती नदीवरील पुलाचे कामे पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे परंतु, शुकनदीवरील पुलाचे काम अद्यापही सुरुच आहे. त्यातच ऐन पावसाच्या तोंडावर शुकनदी ते शांतीनदीपर्यंतचा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे शांती नदी ते शुकनदीपर्यतचा संपूर्ण रस्ता चिखलमय आहे.

शुकनदीवरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे सोनाळीत जाणाऱ्या जुन्या मार्गाने सध्या  वाहतूक सुरू आहे. तेथे नदीवर लहान पाईप घालून त्यावरून सध्या वाहतुक सुरू होती. परंतु,  गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाले प्रवाहीत होण्यास सुरुवात झाली आहे. शुकनदीही प्रवाहित झाली असून रात्रीपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे.

शुकनदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे पर्यायी मार्गावरील मोरी पाण्याखाली जाण्याची शक्यता होती तसे झाल्यास या मार्गावरुन होणारी वाहतूक ठप्प होण्याची नामुष्की ओढावणार होती. त्यामुळे गेले दोन दिवस शुकनदीवरील पुलाच्या जोडरस्त्याचा भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.  

दरम्यान, दुपारी एकेरी वाहतुक सुरू करण्याइतपत भराव पूर्ण झाला. त्यामुळे तेथून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची नामुष्की टळली आहे. मात्र, संपूर्ण जोडरस्ता पूर्ण होण्यास अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंतीचे कामदेखील अपूर्ण आहे.

वाहतूक सुरू पण धोकादायक

शुकनदीच्या पुलावरून एकेरी वाहतुक सुरू झाली असली तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे. त्यामुळे दुचाकी चालविणे मुश्किल झाले आहे. एकीकडे चिखलाचा रस्ता आणि दुसरीकडे अर्धवट रस्ता खोदलेला असल्यामुळे येथून वाहतूक धोकादायक आहे.

चार महिन्यांनंतर मुख्य रस्त्याने वाहतूक सुरू

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर शुकनदीचा पूल सर्वांत मोठा आहे. येथील जुना पूल २३ जानेवारीला कोसळण्यात आला. मात्र, ठेकेदाराची संथगती आणि नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे तब्बल चार महिन्यांनी मुख्य रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.

Web Title: One-way traffic begins on newly constructed bridge over Shukanadi connecting Vaibhavwadi city, avoiding the embarrassment of closing the Talere Kolhapur National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.