Sindhudurg: करुळ घाटातून आजपासून एकेरी एसटी वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:39 IST2025-03-04T15:36:43+5:302025-03-04T15:39:27+5:30
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी तब्बल ४०५ दिवस होती बंद

Sindhudurg: करुळ घाटातून आजपासून एकेरी एसटी वाहतूक सुरू
वैभववाडी : दुपदरीकरणासाठी गेल्यावर्षी बंद केलेली करुळ घाटातील एसटी वाहतूक तब्बल ४०५ दिवसांनंतर उद्या (दि. ४) पासून पूर्ववत सुरु होणार आहे. ही एसटी वाहतूकही एकेरी असणार आहे. त्याबाबतचे आदेश परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी करुळ घाटमार्ग गेल्यावर्षी २२ जानेवारी २०२४ पासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटमार्गाची बहुतांश एसटी वाहतूक भुईबावडा घाटातून व अन्य अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती. २४ फेब्रुवारीला तब्बल ३९७ दिवसांनी करुळ घाटमार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे चारचाकी तसेच व ट्रक यांसारखी वाहनांचा करुळ घाटाने आठवड्यापूर्वी प्रवास सुरु झाला. मात्र एसटी सुरु झाली नव्हती.
सिंधुदुर्गातूनकोल्हापूरच्या फेऱ्या
दरम्यान, सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या फेऱ्या करुळ घाटमार्गे पूर्ववत कराव्यात. मात्र कोल्हापूरकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या सर्व फेऱ्या सध्या सुरु आहे; तशाच भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे सुरु ठेवाव्यात, असे राज्य परिवहन महामंडळाने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे मंगळवारपासून कोल्हापूरकडे जाणाऱ्यांना करुळ घाटमार्गे तर कोल्हापूरकडून सिंधुदुर्गात येणाऱ्या एसटी प्रवाशांना भुईबावडा घाटमार्गे प्रवास करावा लागणार आहे.