भरधाव कारने पादचाऱ्याला उडविले, एक जण गंभीर जखमी; खारेपाटण येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:26 IST2022-01-12T13:21:30+5:302022-01-12T13:26:50+5:30
खारेपाटण(कणकवली) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण संभाजी नगर येथे आज, बुधवारी सकाळी ८.४५ वाजता मुंबई वरून आलेल्या व गोव्याच्या दिशेने ...

भरधाव कारने पादचाऱ्याला उडविले, एक जण गंभीर जखमी; खारेपाटण येथील घटना
खारेपाटण(कणकवली) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण संभाजी नगर येथे आज, बुधवारी सकाळी ८.४५ वाजता मुंबई वरून आलेल्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने (क्रमांक एम. एच. १२-एल. पी. ९३९५) रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका स्थानिक पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यात हा पादचारी गंभीर जखमी झाला. विठ्ठल रामचंद्र गुरव (वय ५८, खारेपाटण, गुरववाडी -संभाजी नगर) असे त्यांचे नाव आहे. या अपघातानंतर कार चालक पसार झाला.
अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव तसेच संभाजी नगर खारेपाटण येथील युवकांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघातग्रस्त जखमीला पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. जखमी गुरव यांच्या डावा हात आणि पाय फॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर कार चालक कारसह तिथून पसार झाला. यानंतर मुंबई-गोवा महामार्ग नडगिवे येथे संबधित इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला सोडून तेथून दुसऱ्या गाडीने पसार झाला. खारेपाटण चेक पोस्टचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच अपघातग्रस्त इनोव्हा गाडी पंचनामा करून ताब्यात घेतली. अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे आणि पराग मोहिते करीत आहेत.
खारेपाटण येथे संभाजी नगर जवळील मधूबन हॉटेल येथे ब्रिजपासून अगदी जवळच हा अपघात झाला. येथे असलेले धोकादायक वळण तसेच महामार्गाला थेट जोडला गेलेला कोल्हापूर राज्यमार्ग हे त्याला कारणीभूत असून सध्या या ब्रिजचे काम सुरू असून जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अजूनही इथे अपघात होण्याची शक्यता आहे.