One commits suicide in Columbus | कोळंब येथील एकाची आत्महत्या
कोळंब येथील एकाची आत्महत्या

ठळक मुद्देकोळंब येथील एकाची आत्महत्यापोलिसांकडून पंचनामा सुरू

मालवण : कांदळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, खापरेश्वर देवस्थानचे प्रमुख मानकरी हेमकांत ऊर्फ पपन यशवंत मेथर (५६ रा. कोळंब) यांनी रेवंडी गोठण दोन वड येथील वडाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच कोळंबसह, मित्र परिवारांमध्ये एकच खळबळ उडाली.

कोळंब येथील रहिवासी असलेले पपन मेथर हे सर्जेको येथील श्रीदेव खापरेश्वर, कांदळगाव श्रीदेव रामेश्वराचे ते मानकरी होते. दत्तजंयती दिवशी दुपारी ते घरातून पिशवी घेऊन बाहेर पडले होते. ते सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी रेवंडी गोठण दोन वड येथे गेलेल्या स्थानिक ग्रामस्थांना एका व्यक्तीने वडाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती कोळंबमधील स्थानिकांना देताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती दिली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, संतोष गलोले, प्रसाद आचरेकर, विवेक नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मेथर यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो पपन मेथर यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवस मृतदेह तसाच असल्याने चेहरा तसेच संपूर्ण शरीर काळवंडले होते.

घटनास्थळाच्या बाजूला प्लास्टिक पिशवी व नायलॉन दोरी तसेच काही अंतरावर त्यांची दुचाकी आढळून आली. दोन वड येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, संदीप भोजने, ग्रामपंचायत सदस्य गणेश आचरेकर, प्रियाल लोके, विनायक धुरी, भास्कर कवटकर, राजू हडकर, अनिल न्हिवेकर, उमेश मांजरेकर, सौगंधराज बादेकर यांच्यासह मेथर यांच्या मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मेथर यांच्या आत्महत्येचा त्यांचा मित्र परिवारास मोठा धक्का बसला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनामा सुरू होता.
 

Web Title: One commits suicide in Columbus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.