गोव्यात स्थिरावलेला 'ओंकार' हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:30 IST2025-09-27T19:30:18+5:302025-09-27T19:30:44+5:30
सातोसे- रेखवाडी येथे हजेरी; पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड..

छाया: अजित दळवी
बांदा : गेले दहा दिवस तोरसे - तांबोसे पेडणे येथे गोव्याच्या सीमेवर स्थिरावलेल्या "ओंकार" हत्तीने आज शनिवारी दुपारी मडुरा-सातोसे सीमेवर असलेल्या रेखवाडीत हजेरी लावली. थेट अनेकांच्या अंगणात हत्ती दाखल झाल्यामुळे हत्तीला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तांबोसे - उगवे (गोवा) भागातून तेरेखोल नदीतून ओंकारने सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात मडूरा - सातोसे सीमेवर रेखवाडी येथे ओंकार हत्ती शनिवारी दुपारी दाखल झाला. त्यामुळे सिंधुदुर्गवनविभागाची एकच धांदल उडाली. सातोसे रेखवाडी येथे हत्ती चक्क स्थानिकांच्या अंगणात दाखल झाला. भर वस्तीमधील पाणंदीमध्ये तो बिनधास्तपणे फिरत होता. यावेळी त्याने भात शेती व भाजीपाला शेतीची नासधूस केली.
ओंकारची छबी मोबाईल मध्ये टिपण्यासाठी युवा वर्गाची झुंबड उडाली होती. मात्र वनविभागाचे कर्मचारी हत्तीपासून लांब राहण्याचे आवाहन नागरिकांना करत होते. वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे कर्मचारी ओंकारला नागरी वस्तीपासून दूर नेण्याचे प्रयत्न करत आहेत. तर, हत्ती पुन्हा गोव्यात येऊ नये म्हणून तेरेखोल नदीच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात अॅटमबॉम्ब फोडण्यात येत होते.