'ओंकार' हत्तीची दहशत, शेतकरी भीतीच्या छायेत; सिंधुदुर्ग, गोव्यात घालतोय थैमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:02 IST2025-10-01T13:02:21+5:302025-10-01T13:02:35+5:30
उपाययोजना न केल्याने ग्रामस्थ आक्रमक

'ओंकार' हत्तीची दहशत, शेतकरी भीतीच्या छायेत; सिंधुदुर्ग, गोव्यात घालतोय थैमान
बांदा : पत्रादेवी, तांबोस (गोवा) नंतर सिंधुदुर्ग सिमेवर पुन्हा एकदा 'ओंकार' हत्तीने दहशत माजवली. कास, मडुरा, सातोसे सीमाभागातील् नागरिक सतत भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. मागील चार दिवसांपासून हा हत्ती वारंवार गावात घुसून शेतपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहे.
ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. केवळ फटाके लावणे आणि पाळत ठेवणे एवढ्यापुरतीच विभागाची कार्यवाही मर्यादित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मंगळवारी ग्रामस्थांनी मडुरा काळाआंबा येथे एकत्र येत वन अधिकाऱ्यांना घेराव घातला. आमची शेती, आमचं उपजीविकेचं साधन उद्ध्वस्त होत आहे. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी मडुरा माजी सरपंच सुरेश गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित,कास तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबू पंडित यांच्यासह असंख्य ग्रामस्थ शेतीसह कुटुंबाच्या संरक्षणासाठी घटनास्थळी हजर होते. मंगळवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार रात्री दिवसांपासून हा हत्ती कास परिसरात थांबला होता. परंतु सोमवारी मध्यरात्री त्याने तेरेखोल नदी पार करत थेट गोवा राज्यातील तांबोसे गाव गाठले. तिथेही त्याने शेतात घुसून पिकांची उधळण केली. अचानक रात्री गावात हत्ती दाखल झाल्याने नागरिक घराबाहेर न पडता भीतीने थरथर कापत होते.
कास परिसरात घुसून भात व केळीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ग्रामस्थांनी टाळ्या वाजवत, आवाज करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण 'ओंकार'ने कुठलाही प्रतिकार न करता निर्धास्तपणे गावाच्या आतमध्ये प्रवेश केला. पण 'ओंकार'ने कुठलाही प्रतिकार न करता निर्धास्तपणे गावाच्या आतमध्ये प्रवेश केला.
वन कर्मचारी आपापल्या परीने हत्तीवर लक्ष ठेवून आहेत; परंतु वरिष्ठ पातळीवरून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्यांच्या जीवनालाही थेट धोका निर्माण झाला आहे. वनमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून या हत्तीचा बंदोबस्त करावा. अन्यथा ग्रामस्थ कठोर आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून हा हत्ती कधी गोव्यात, तर कधी सिंधुदुर्गात येऊन थैमान घालत आहे. त्यामुळे सीमेवरील गावातील नागरिकांना दिवसरात्र भीतीने जगावे लागत आहे. शेतकऱ्यांची अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी हत्ती गावात घुसू नये म्हणून शेतकरी स्वतःच पहारेकरी बनून शेतात रात्रभर जागरण करत आहेत, आता प्रशासनाने गंभीरतेने दखल घ्यावी. - प्रवीण पंडित, सरपंच, कास