वनमंत्र्यांच्या सूचना अधिकारी पाळत नाही, दीपक केसरकरांकडून घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:08 IST2025-06-17T16:07:55+5:302025-06-17T16:08:24+5:30
हत्ती हटाव मोहीम फक्त अधिकाऱ्यांमुळेच रखडली

वनमंत्र्यांच्या सूचना अधिकारी पाळत नाही, दीपक केसरकरांकडून घरचा आहेर
सावंतवाडी : वनमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतरही अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी माझा आग्रह असून लवकरच ही बाब वनमंत्र्यांच्या निर्देशानुसार आणून दिले जाईल. हत्ती हटाव मोहीम फक्त अधिकाऱ्यांमुळेच रखडली आहे. असा घरचा आहेर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, विद्याधर परब, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, दोडामार्ग, मांगेली येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. जीवितहानीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने दक्षता घेणे आवश्यक आहे. गवस कुटुंबाची मी लवकरच भेट घेणार आहे. हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचे ही केसरकर यांनी स्पष्ट केले.
मांगेली-कुसगेवाडी विजेचा जोरदार धक्का लागून घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. महावितरण दक्षता घेणे आवश्यक असून हा अपघात कसा झाला याची चौकशी केली जाणार असल्याचे केसरकर म्हणाले. तसेच विजेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही केसरकर यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार आहे. हायवे लगत असल्याने पूर्णपणे अत्याधुनिक असे हे स्थानक होईल. दरम्यानच्या काळात येथे पडलेले खड्डे व डागडुजी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे हे स्थानक सावंतवाडीत उभे राहील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीकरांनी मला अनेक वर्षे प्रेम दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीची सत्ता नगरपालिकेत दिसेल, असेही म्हणाले.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता
आंबोलीत वन विभागाकडून पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. पर्यटकांना ये-जा करण्यासाठी याचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाशी चर्चा करून होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता घेतली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.