नागरिक हो तुम्हीही व्हा आता पर्यावरण संशोधक !; पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांची नवी चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:16 IST2025-10-16T18:15:45+5:302025-10-16T18:16:00+5:30

सिटीझन सायन्स 

New citizens' movement for environmental protection | नागरिक हो तुम्हीही व्हा आता पर्यावरण संशोधक !; पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांची नवी चळवळ

नागरिक हो तुम्हीही व्हा आता पर्यावरण संशोधक !; पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांची नवी चळवळ

संदीप बोडवे

मालवण : जगभरात हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, जंगलतोड, जलसंकट आणि प्रदूषण यासारखी अनेक संकटे वाढत आहेत. या आव्हानांचा परिणाम फक्त निसर्गावरच नाही, तर थेट मानवी जीवनावर होत आहे. पाऊस अनिश्चित होणे, उन्हाळ्याचे तापमान वाढणे, पाणीटंचाई, पूर व दुष्काळ यांच्या वारंवारिता – हे सारे बदल आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. ही समस्या केवळ वैज्ञानिक किंवा सरकारी पातळीवर सोडवता येणार नाही. संपूर्ण समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठीच सिटीझन सायन्स म्हणजेच नागरिक विज्ञान ही संकल्पना जगभरात वेगाने पुढे येत आहे. 

नागरिक विज्ञान म्हणजे काय? 

नागरिक विज्ञान म्हणजे सामान्य नागरिकांनी वैज्ञानिक संशोधनासाठी आपला सहभाग नोंदवणे. यात शास्त्रज्ञ नसलेल्या व्यक्ती हवामान निरीक्षण, पक्षी व प्राणी गणना, नदी-तलावांचे परीक्षण, झाडांची नोंदणी, कचरा मॅपिंग अशा क्रियाकलापांतून उपयुक्त माहिती गोळा करतात. या माहितीचा उपयोग शास्त्रज्ञ संशोधन, हवामान बदलाचा अभ्यास, वन्यजीवांचे संवर्धन, धोरणे ठरवणे यासाठी करतात. विशेष शैक्षणिक पात्रता आवश्यक नसते; जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि निसर्गाशी जोडलेले मन हेच याचे खरे भांडवल आहे. आज मोबाईल अॅप्स, GPS, फोटोग्राफी, इंटरनेट यामुळे कोणालाही निरीक्षणे नोंदवून ती शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवता येतात. यामुळे लाखो स्वयंसेवकांचा एक विशाल डेटा-नेटवर्क तयार होतो, जो संशोधनासाठी अमूल्य ठरतो. 

देहराडून राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर 

नागरिक विज्ञानाची ताकद प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एफटीसीबी द्वारे प्रायोजित, केंद्रीय राज्य वनसेवा अकादमी च्या वतीने आयोजित उत्तराखंडच्या देहराडून येथे अलीकडेच “जंगल आणि वन्यजीव संवर्धनातील नागरिक विज्ञानाची भूमिका” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. यात देशभरातील सुमारे ३० प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात लोकमतचे संदीप बोडवे यांचाही सहभाग होता. 


शिबिरातील प्रमुख सत्रे व अनुभव:

नागरिक विज्ञानाची संकल्पना आणि व्यापक स्वरूपाची जाणीव, डेटा संकलन व नोंदणीचे प्रात्यक्षिक, तांत्रिक साधनांचा वापर, वन्यजीव संरक्षण कायदे व धोरणे, स्थानिक समुदायाशी संवाद, जैवविविधता निरीक्षण

का आहे आवश्यकता: 

मोठ्या प्रमाणावर डेटा संकलन....
देशातील प्रत्येक भागातील हवामान, वन्यजीव, नदी-तलाव याबद्दल प्रचंड प्रमाणात माहिती हवी असते. शास्त्रज्ञ व सरकारी यंत्रणा एकट्याने हे करू शकत नाहीत. नागरिकांच्या सहभागामुळे डेटा संकलन झपाट्याने वाढते. 

स्थानिक ज्ञानाचे महत्त्व....
स्थानिक लोकांना आपल्या परिसराची खरी माहिती असते. पावसाच्या पद्धती, पक्ष्यांचे स्थलांतर, वनस्पतींचा ऋतुनुसार बदल – ही माहिती अमूल्य आहे. 

जनजागृती व जबाबदारीची जाणीव....
नागरिक विज्ञानात सहभागी झालेला प्रत्येक जण पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक होतो. त्यातून सामूहिक जबाबदारीची भावना वाढीस लागते. 

धोरणनिर्मितीसाठी मदत....
मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकालीन डेटा उपलब्ध झाल्यास सरकारला योग्य धोरणे आखता येतात. हवामान बदल, जंगल संवर्धन, शहरी नियोजन यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते. 

देहराडून प्रशिक्षण शिबिरातून संदेश: 

प्रशिक्षण आणि साधने आवश्यक: नागरिकांना मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य दिल्यास ते दर्जेदार डेटा गोळा करू शकतात. शैक्षणिक संस्थांचा सहभाग: शाळा, महाविद्यालयांतून नियमित उपक्रम राबवणे गरजेचे आहे. शासन व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य: निधी, साधनसामग्री, प्रचार यासाठी मजबूत नेटवर्क आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग: मोबाईल अॅप्स, GPS, GIS नकाशे यांचा वापर अधिकाधिक करणे. ग्रामीण भागातील विशेष मोहीमा: गावोगाव कार्यशाळा, निसर्ग क्लब, युवक मंडळे यांच्या माध्यमातून जनजागृती.

ॲप किंवा साधनाचे नाव व उपयोगिता: 

इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल - सर्व प्रकारच्या सजीवांची नोंद, फोटो, ठिकाण (GPS) आणि माहिती अपलोड करा. 
आय-नॅचरलिस्ट - फोटोवरून प्रजाती ओळखा, स्मार्टफोन कॅमेऱ्याने फोटो काढा, ॲपमध्ये अपलोड करा. ▪️ई-बर्ड - पक्षीनिरीक्षण, गणना, पक्ष्याची संख्या, नावे, ठिकाण नोंदवा. 
मर्लिन बर्ड आयडी - पक्षी ओळखण्याचे साधन, फोटो/आवाज टाका, शक्य प्रजाती/नावे मिळवा. ▪️सीझनवॉच - झाडांच्या ऋतूबदलाची नोंद, एका विशिष्ट झाडावर सप्ताह/महिन्याने निरीक्षण करा. 
मायग्रंट वॉच- स्थलांतरित पक्ष्यांची माहिती, हिवाळ्यात/प्रवासात पक्षी दिसल्यास नोंद करा. ▪️फ्रॉग फाइंड- बेडूकाचे फोटो/आवाज ओळखणे विशेषतः पावसाळ्यात किंवा रात्री निरीक्षणात उपयुक्त. 

लक्षात ठेवा: 

प्रत्येक निरीक्षणाच्या वेळी फोटो किंवा ध्वनी स्पष्ट असावा. 
दोन्ही नोंदीसाठी ठिकाण (GPS), तारीख व वेळ आवश्यकपणे लिहा. 
समुदायातील इतरांनीही निरीक्षणे शेअर केली आहेत का, हे तपासा आणि चर्चेत भाग घ्या. 
दुर्मिळ किंवा संवेदनशील प्रजातीच्या ठिकाणाची माहिती गोपनीय ठेवता येते, ॲपमध्ये "गोपनीयता" पर्याय वापरावा. 

सहभाग कसा घ्यावा? 

आपल्या परिसरातील झाडे, पक्षी, प्राणी, नदी-तलाव याची निरीक्षणे नोंदवावीत. 
फोटो किंवा ध्वनीची नोंद घेऊन, माहिती योग्य ॲपमध्ये अपलोड करावी. 
शाळांच्या विज्ञान प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा व स्थानिक स्तरावरील जनजागृती मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा. 
समुदायातील इतर नागरिक, विद्यार्थी व स्थानिक संस्था यांच्या गटामध्ये माहिती शेअर करावी.

सहभागाचे महत्व

देशभरातील विविध भागांतील माहिती मिळाल्यास वैज्ञानिक संशोधन व धोरणनिर्मितीत मदत होते. - स्थानिकांचे अनुभव आणि निरीक्षण हे अधिक अचूक असल्यामुळे डेटा आपोआप मूल्यवान ठरतो. - नागरिकांचा सहभाग वाढला की पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि जबाबदारीची भावना बळकट होते. - मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ उपलब्ध डेटा हवामान बदल, प्रदूषण नियंत्रण, जैवविविधता रक्षण यासाठी आवश्यक असतो.

Web Title : नागरिक वैज्ञानिक बनें: पर्यावरण संरक्षण के लिए नया आंदोलन!

Web Summary : नागरिक विज्ञान सभी को पर्यावरण अनुसंधान में योगदान करने का अधिकार देता है। ऐप्स का उपयोग करके वन्यजीव, जलवायु और प्रदूषण पर डेटा एकत्र करें। यह सामूहिक प्रयास वैज्ञानिकों और नीति निर्माताओं को संरक्षण में सहायता करता है।

Web Title : Become citizen scientists: New movement for environment protection!

Web Summary : Citizen science empowers everyone to contribute to environmental research. Collect data on wildlife, climate, and pollution using apps. This collective effort aids scientists and policymakers in conservation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.