Vaibhav Naik Probed By ACB : नारायण राणेंचा 'जायंट किलर' अडचणीत, एसीबीकडून ठाकरे समर्थक आमदाराची चौकशी
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 7, 2022 21:51 IST2022-10-07T21:50:32+5:302022-10-07T21:51:07+5:30
Shiv Sena MLA Vaibhav Naik Probed By ACB : दरम्यान नाईक यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या अधिकाऱ्यांनी आपणाला सायंकाळी उशिरा फोन केला. त्यावेळी आपण कणकवलीतच होतो.

Vaibhav Naik Probed By ACB : नारायण राणेंचा 'जायंट किलर' अडचणीत, एसीबीकडून ठाकरे समर्थक आमदाराची चौकशी
सिंधुदुर्ग: रत्नागिरी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकासह शुक्रवारी सायंकाळी उशिरा कणकवलीत दाखल झाले. या पथकातील अधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, येथील शासकीय विश्रामगृहावर नाईक दाखल झाले. या ठिकाणी नाईक यांची सुमारे एक तास चौकशी करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान नाईक यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या अधिकाऱ्यांनी आपणाला सायंकाळी उशिरा फोन केला. त्यावेळी आपण कणकवलीतच होतो. त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार आपण शासकीय विश्रामगृहावर दाखल होत त्यांना आवश्यक माहिती दिलेली आहे. तसेच त्यांनी मागितलेली इतर माहिती व विवरण पत्रे त्यांना सादर करण्यात येतील. एवढेच नाही, तर हा प्रकार म्हणजे दबाव तंत्राचा प्रकार आहे. गृहखात्याच्या दबावाखाली हा प्रकार सुरू असून, असे कितीही प्रकार केले तरी आम्ही त्याला भीक घालत नाही, असे नाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान सत्ता बदल होताच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची इडी, सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई केली जात असतानाच आता आमदार नाईक यांची एसीबी मार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या अनुषंगाने आमदार नाईक यांचा जबाब नोंदविण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही आमदार नाईक यांना पत्र देण्यात आले आहे.