Sindhudurg Crime: किनळे येथील अंगणवाडी सेविकेचा खून दागिन्यांसाठीच, आरोपीची कबुली

By सुधीर राणे | Updated: March 5, 2025 13:21 IST2025-03-05T13:20:55+5:302025-03-05T13:21:38+5:30

अन्य कोणतेही कारण नसल्याचे केले स्पष्ट

Murder of anganwadi worker in Kinale for jewellery accused confesses | Sindhudurg Crime: किनळे येथील अंगणवाडी सेविकेचा खून दागिन्यांसाठीच, आरोपीची कबुली

Sindhudurg Crime: किनळे येथील अंगणवाडी सेविकेचा खून दागिन्यांसाठीच, आरोपीची कबुली

कणकवली: सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे (५९) हिचा खून दागिन्यांसाठीच केला असल्याची कबुली संशयित आरोपी वितोरीन रुजाय फर्नांडीस (रा. वेंगुर्ले, आरवली-टांक) याने पोलिस तपासा दरम्यान दिली आहे. डोक्यात दुचाकीच्या शॉकप्सरचा लोखंडी रॉड मारून तिला ठार मारल्याचेही तो सांगत आहे.

ओसरगाव येथे मुंबई-गोवा महामार्गानजीक सुचिता सोपटे हिला आणून सायंकाळी ७.३०वाजण्याच्या सुमारास तिच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला आणि ती मेल्याची खात्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. महिलेच्या डोक्यावर त्याने मारलेला रॉड आणि जाळण्यासाठी वापरलेले पेट्रोलचे कॅन या वस्तू तिचा खून करून वेंगुर्लेकडे परत जाताना कसाल पुलाखाली टाकले होते. ते कॅन आणि तो रॉड पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

तपासा दरम्यान आरोपीने महिलेचे घेतलेले दागिने, तिचे दोन मोबाईल पोलिसांनी त्याच्या घरातून हस्तगत केले आहेत. तसेच सोनाराकडे विकलेले दागिनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. खून झाला त्या घटनेच्या आदल्यादिवशी आरोपी महिलेला घेवून कोल्हापूरला गेला होता. त्यामुळे तो कोल्हापूरला का गेला होता याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला तिकडे नेवून तपास केला आहे. या तपासात अनेक बाबी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांच्याच हव्यासापोटी केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. 

सुचिता सोपटे आणि आरोपीची पूर्वीपासून ओळख होती. कोल्हापूरला ती गेली होती परंतू तसे महत्वाचे असे काहीच काम नव्हते. कोल्हापूरला ते गेल्याचे आणि तेथून परत आल्याचे आंबोली येथील तपासणी नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट झाले आहे. त्यानंतर ते दोघे कुडाळला आले. तेथील एका लॉजमध्ये सुचिता सोपटे हि राहिली तर आरोपी आपल्या गाडीने घरी निघून गेला. तेही सीसीटिव्ही फुटेज सापडले आहे. तर घटना घडली त्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सकाळी तो तिला नेण्यासाठी परत लॉजवर आला होता.

त्यानंतर ते मालवणसह अनेक ठिकाणी फिरले. सायंकाळी तो तिला घेवून ओसरगाव येथे आला. त्या महिलेचे काही दागिने त्याच्याकडे होते. हे दागिने तिने आपल्या जावेकडून घेतले होते. कदाचित त्या महिलेने दागिने देण्यासाठी तगादा लावला असेल आणि त्या रागातून आरोपीने तिला ओसरगाव येथे आणून तिचा खून केला असेही तपासात पुढे येत आहे.

खुनात आणखी कोणाचा सहभाग?  

आरोपीने सुचिता सोपटे हिचा खून केला असला तरी त्यापूर्वीच खूनाचा कट रचला नव्हता, असेही त्याने पोलिसाना  सांगितले आहे.या खुनात आणखी कोणाचा सहभाग होता का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान,आणखी तीन दिवस आरोपी पोलिस कोठडीत असल्याने अन्य काही मुद्दे तपासात समोर येण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Murder of anganwadi worker in Kinale for jewellery accused confesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.