Sindhudurg: ट्रकची कारला भीषण धडक, अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 9, 2023 15:19 IST2023-09-09T15:01:15+5:302023-09-09T15:19:00+5:30
शिरगाव ( सिंधुदुर्ग ): देवगड नांदगाव मार्गावर तोरसोळे फाटा येथील वळणावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील ...

Sindhudurg: ट्रकची कारला भीषण धडक, अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू
शिरगाव (सिंधुदुर्ग): देवगड नांदगाव मार्गावर तोरसोळे फाटा येथील वळणावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तळेबाजार येथील महेश तोरसकर (वय-५२) आणि त्यांची आई मनिषा तोरसकर (७५) अशी मृत दोघांची नावे आहेत. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शनिवारी सकाळी घडला.
तळेबाजार येथील व्यापारी महेश तोरसकर हे कार क्रमांक (एम.एच-०७-क्यू-३८५०) मधून कसाल येथील आपल्या नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान देवगड नांदगाव मार्गावर तर तोरसोळेफाटा येथे वळणावर समोरून येणाऱ्या (सीजी ०५ डीएफ ९८१६) या १४ चाकी ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत कारमधील महेश आणि त्याची आई मनिषा तोरसकर हे जागीच ठार झाले. तर श्रद्धा गुरुनाथ पारकर (वय-५५) व गुरुनाथ श्रीपाद पारकर (६०) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. देवगड नांदगाव मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेसीबीच्या सहाय्याने गटारातील अपघातग्रस्त चारचाकी बाहेर काढण्यात आली. संतप्त ग्रामस्थांनी चिरे खाणीवर जाणारे ट्रक अडवून ते रिकामे माघारी पाठवून आपला राग व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील तपास सुरु केला आहे.