कोकणात वानरांचा उच्छाद; सरकारची 'पकडा आणि ६०० रुपये मिळवा’ योजना अजब, शेतकरी व्याकुळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:39 IST2026-03-23T15:39:24+5:302026-03-23T15:39:42+5:30
वानर पकडायचे कसे? शेतकऱ्यांचा वन विभागाला संतप्त सवाल; बागायतदारांचे अतोनात नुकसान

संग्रहित छाया
सिंधुदुर्ग : कोकणच्या निसर्गरम्य पट्ट्यात सध्या वानरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हातातोंडाशी आलेला घास ही वानरसेना हिरावून घेत असून, शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत. घरांवरील कौले फोडण्यापासून ते बागेतील कलमे फस्त करण्यापर्यंत या वानरांचा वावर वाढला आहे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘एक वानर पकडा आणि ६०० रुपये मिळवा’ अशी अजब योजना जाहीर केली आहे. मात्र, जे वानर वन विभागाच्या जाळ्यात अडकत नाहीत, त्यांना सामान्य शेतकऱ्यांनी कसे पकडायचे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात काजू, आंबा आणि सुपारीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. माड-पोफळीवर चढून वानर कोवळी फळे पाडत आहेत. ग्रामीण भागात घरांवरील कौलांची तर अक्षरशः ‘चाळण’ केली जात आहे. पावसाळा तोंडावर असताना घरांची दुरुस्ती कशी करावी, या विवंचनेत नागरिक आहेत.
सरकारची अजब योजना
शासनाने वानर नियंत्रणासाठी ६०० रुपयांचे आमिष दाखवले आहे. मात्र, वानर पकडण्यासाठी लागणारे पिंजरे, जाळी आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांकडे नाही. ‘स्वतःला न जमलेले काम शेतकऱ्यांच्या गळ्यात मारून शासन आपली जबाबदारी झटकत आहे’, अशी भावना बागायतदारांमध्ये आहे.
अशीही फटकेबाजी
वानरांचा वाढलाय लवाजमा,
शेतकऱ्यांचा संपलाय संयमा!
६०० रुपयांची कसली ही ओढ?
आधी आमच्या नुकसानाचा तिढा सोड!
वन विभागाचा ‘विचित्र’ दावा
वन विभागाच्या मते लोकसहभागातून वानरांची समस्या सुटू शकते. पकडलेल्या वानरांना सुरक्षितस्थळी सोडण्याची जबाबदारी विभागाची असली, तरी प्रत्यक्ष पकडण्याची जबाबदारी मात्र शेतकऱ्यांवर टाकण्यात आली आहे. खासगी रेस्क्यू टीमचा खर्च हजारोंच्या घरात असताना ६०० रुपयांत कोण जीव धोक्यात घालणार? हा कळीचा मुद्दा आहे.
शासनाची ६०० रुपयांची योजना म्हणजे आमची थट्टाच आहे. वन विभागाला जे वानर पकडणे जमले नाही, ते आम्ही बागायतदारांनी कसे पकडायचे? आमचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना अशा पोकळ घोषणांऐवजी ठोस उपाययोजनांची गरज आहे. - दीपक भोगले, बागायत, मालवण