मोबाईल शॉपी फोडणाऱ्यास पकडले,१९ मोबाईल केले हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:59 IST2019-12-04T13:57:44+5:302019-12-04T13:59:03+5:30
वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील ह्यहॅलोह्ण मोबाईल शॉपी फोडून सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या चंदन रामू चौहान ...

मोबाईल शॉपी फोडणाऱ्यास पकडले,१९ मोबाईल केले हस्तगत
वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील ह्यहॅलोह्ण मोबाईल शॉपी फोडून सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या चंदन रामू चौहान (२७, रा. आझमगढ) याला स्थानिक गुन्हा अन्वेषणने मंगळवारी सायंकाळी कोकिसरे बेळेकरवाडी येथून ताब्यात घेतले.
त्याच्याकडून २२ पैकी १९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वी बाजारपेठेत झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हात असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. बाजारपेठेतील हॅलो मोबाईल शॉपी शुक्रवारी (ता. २९) रात्री फोडून शॉपीतील १ लाख रुपये किमतीचे २२ मोबाईल चोरट्याने लंपास केले होते. हा चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी शॉपी मालक इम्तियाज काझी यांनी दुकान उघडल्यानंतर निदर्शनास आला होता.
यासंदर्भात त्यांनी वैभववाडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बाजारपेठेत रहदारीच्या ठिकाणी ही चोरी झाल्यामुळे पोलीस चक्रावले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीस गेल्यामुळे स्थानिक पोलिसांसोबत स्थानिक गुन्हा अन्वेषण गुन्ह्यांचा तपास करीत होते. या पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागल्यानंतर सायंकाळी चोरट्यास पकडण्याच्या दृष्टीने वैभववाडीत सापळा रचला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष खांदारे, पोलीस हवालदार संकेत खाडे, पोलीस कर्मचारी स्वप्नील तोरसकर, रवी इंगळे, रविकांत अडुळकर, राजू जामसंडेकर, योगेश राऊळ, मारुती सोनटक्के यांच्या पथकाने संशयित आरोपी चंदन चौहान याला कोकिसरे बेळेकरवाडी येथे राहत असलेल्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेत मोबाईल शॉपीमधून चोरलेले २२ पैकी १९ मोबाईल पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. तीन मोबाईल अद्याप सापडलेले नाहीत.
पोलिसांनी पकडलेला चोरटा हा आझमगढ, उत्तरप्रदेश येथील असून गेली अनेक वर्षे तो वैभववाडी तालुक्यात प्लॅस्टर, फरशीची कामे करीत होता. बाजारपेठेत झालेल्या आणखी काही चोऱ्यांमध्ये त्याचा हात आहे का? याचा तपास आता पोलीस करणार आहेत. ही चोरी त्याने एकट्याने केली किंवा त्याचा आणखी कोणी साथीदार आहे? याचीही पोलीस कसून चौकशी करीत आहेत.